आपल्या नेतृत्वाखाली भाजपला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून देऊन नरेंद्र मोदी यांनी आपणच गुजरातचे ‘राजे’ असल्याचे दाखवून दिले. काँग्रेसच्या सर्व दिग्गजांनी लावलेला जोर आणि केशुभाई पटेल यांच्या रूपात उभे ठाकलेले आव्हान मोडीत काढून भाजपने सलग पाचव्यांदा गुजरातमध्ये सत्ता राखली. भाजपने ११५ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला ६१ जागांवर समाधान मानावे लागले. या एकहाती विजयाचे शिल्पकार असलेले मोदीच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील, हे निश्चित आहे. मात्र, त्याच वेळी मोदींनी या विजयाद्वारे पंतप्रधानपदासाठीचा आपला दावाही बळकट केल्याचे बोलले जात आहे. राजधानी दिल्लीत गुरुवारी दिवसभर हीच चर्चा सुरू होती; तर दुसरीकडे, मोदींनी ‘हा विजय तमाम देशवासीयांचा विजय आहे,’ असे विजयानंतर हिंदीतून केलेल्या भाषणात सांगितल्याने खुद्द नरेंद्रभाईही राजधानीकडे डोळे लावून बसल्याचे स्पष्ट झाले.

पीएम, पीएम..
ज्यांना आपली भरभराट व प्रगती साधायची आहे, त्यांचा हा विजय आहे, भारतमातेचे भले चिंतणाऱ्यांचा हा विजय आहे, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले. मोदींचे भाषण सुरू असताना प्रेक्षकांमधून ‘पीएम पीएम’ अशा घोषणा देण्यात आल्या. याची दखल घेत मोदी यांनी तुमची इच्छा असेल तर मी दिल्लीला नक्की जाईन, तूर्तास  येत्या २७ तारखेला दिल्लीतील मुख्यालयाला भेट देईन, असे ते म्हणाले.

पण जागा घटल्या, मंत्रीही पराभूत
गुजरातमध्ये भाजपने पाचव्यांदा विजय मिळवला असला तरी मोदी १२५हून अधिक जागा जिंकतील, हा निवडणुकोत्तर चाचण्यांचा अंदाज मात्र फोल ठरला. गतवेळच्या तुलनेत भाजपच्या दोन जागा घटल्या तर काँग्रेसने दोन जागा जास्त जिंकल्या. मोदींचा वारू १२५ जागांच्या पुढे गेला असता तर त्यांना दिल्लीपासून दूर ठेवणे कठीण असल्याचे लक्षात आल्याने भाजप नेत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. दुसरीकडे, गुजरात सरकारमधील पाच मंत्र्यांना मतदारांनी नारळ दिल्याने आगामी मंत्रिमंडळ स्थापताना मोदींसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

चर्चा मोदींचीच
गुजरातची विधानसभा निवडणूकजिंकून विजयाची हॅट्ट्रिक नोंदविणारे ‘नरेंद्र मोदी २०१४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील काय,’ हीच चर्चा गुरुवारी दिल्लीत सर्वत्र सुरू होती. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र मोदींच्या दिल्लीकडे कूच करण्याच्या शक्यतेबाबत सावध पवित्रा घेतला. मोदी पुढच्या गुरुवारी, २७ डिसेंबर रोजी दिल्लीत दाखल होत असून, पुढे काय होणार यावर सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांना रोखणे अवघड आहे, याची कल्पना दिल्लीतील भाजपश्रेष्ठींना आली आहे. एककल्ली स्वभावामुळे ते पक्षात आणि रालोआत ऐक्य अबाधित राखू शकतील का याविषयी भाजप नेत्यांना शंकाच वाटते. त्यामुळेच विजयाबद्दल त्यांचे गुणगान करणारे भाजप नेते मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीच्या प्रश्नांना दिवसभर बगल देत होते. ‘भाजपमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले अनेक नेते आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही लोकशाही पद्धतीने काम करतो, त्यामुळे पंतप्रधानपदासाठी योग्य वेळी योग्य उमेदवाराची निवड केली जाईल,’ असे भाजपचे मुख्य प्रवक्ते रविशंकर प्रसाद म्हणाले. तरीही स्मृती इराणी, राम जेठमलानी यांसारख्या मोदींच्या पाठिराख्यांनी त्यांची पंतप्रधानपदासाठीची दावेदारी पुढे रेटलीच!    

भाजप-काँग्रेसमध्ये सुटकेचा निश्वास
मोदी यांच्या विजयाबद्दल दिल्लीतील भाजप तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. विजयाची हॅटट्रिक साधताना मोदी २००७ च्या विधानसभा निवडणुकीतील ११७ जागांपेक्षा जास्त जागाजिंकतील की कमी, याची भाजप नेत्यांना जरा जास्तच उत्कंठा होती. पराभव झाला तरी मोदींना रोखल्याचा देशभरात संदेश जावा म्हणून त्यांचा विजयरथ ११७ च्या पलीकडे पोचू नये, असे काँग्रेसच्या नेत्यांनाही  वाटत होते. दिवसभर भाजपच्या संख्याबळाचा आकडा १२० ते १२५ च्या दरम्यान रेंगाळत राहिल्याने भाजप तसेच काँग्रेसच्या गोटात बरीच अस्वस्थता होती. शेवटी सायंकाळी सहाच्या सुमाराला मोदींचे संख्याबळ घटून ११५ झाल्याची बातमी येताच त्यांच्या विरोधातील भाजप नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

हा विजय केवळ नरेंद्र मोदीचा विजय नसून सहा कोटी गुजराती जनता आणि समृद्धी व विकासाची इच्छा बाळगणाऱ्या भारतीयांचा विजय आहे. देशाच्या कल्याणाची अपेक्षा ठेवणाऱ्यांचा हा विजय आहे.– नरेंद्र मोदी