भारतीय मच्छीमारांची हत्या

केरळच्या किनाऱ्यावर फेब्रुवारी २०१२ मध्ये दोघा भारतीय मच्छीमारांची हत्या करणाऱ्या इटालीच्या दोन खलाशांविरुद्ध भारतात सुरू असलेला खटला बंद करण्याचा आणि मृत मच्छीमारांच्या नातेवाईकांना १० कोटी रुपये नुकसानभरपाईचे वाटप करण्याबाबतचा आदेश १५ जून रोजी देण्यात येणार असल्याचे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

आंतरराष्ट्रीय लवादाचा निवाडा आणि भारत, इटली आणि केरळ सरकार यांच्यात झालेल्या कराराचा संदर्भ देऊन न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या सुटीकालीन पीठाने स्पष्ट केले की, मॅस्सिमिलानो लॅटोर आणि सॅल्व्हॅटोर गिरोन या इटलीच्या खलाशांविरुद्धचा खटला इटलीमध्ये चालविण्यात येणार आहे.

नुकसानभरपाईचे वितरण करण्याबाबत केरळ  सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, मृत्यू पावलेल्या दोघा मच्छीमारांच्या वारसांना प्रत्येकी चार कोटी रुपये देण्यात येणार आहेत, तर उर्वरित दोन कोटी रुपये सेंट अ‍ॅन्थनी या मच्छीमारी नौकेच्या मालकाला दिले जाणार आहेत. या नौकेवर दोघा मच्छीमारांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली  होती.

इटलीकडून १० कोटी रुपये केंद्राकडे जमा करण्यात आले आहेत आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून ही रक्कम आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करण्यात आली आहे, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितले.