अंमलबाजवणी संचालनालयाकडून शनिवारी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील घरांवर छापे टाकण्यात आले. मात्र, ‘ईडी’चे कृत्य हास्यास्पद असल्याचे सांगत पी. चिदंबरम यांनी सांगितले. दिल्लीच्या जोर बाग येथील ज्या घरावर ‘ईडी’कडून छापा टाकण्यात आला ते घर मुळात माझ्या मुलाच्या मालकीचे नाही. साहजिकच या छाप्यात ‘ईडी’च्या हाताला काहीच लागले नाही. मात्र, काहीतरी कारवाई केली आहे असे दाखवण्यासाठी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी घरातील काही कागदपत्रे उगाचच ताब्यात घेतली, असा दावा पी. चिदंबरम यांनी केला.

मुळात ‘ईडी’ला आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याच्या (पीएमएलए) कक्षेत येणाऱ्या प्रकरणांमध्ये छापे टाकण्याचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी माझा मुलगा कार्ती याने दाखल केलेल्या खटल्यात नोटीस जारी केल्यानंतर चेन्नईच्या घरावर छापा पडेल, अशी अपेक्षा मला होतीच. मात्र, दिल्लीतील घरावर ‘ईडी’ने छापा टाकण्याची कृती हास्यास्पद म्हणावी लागेल. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना हे घर कार्तीच्या मालकीचे आहे, असे वाटले. मात्र, ही गोष्ट खरी नाही. साहजिकच ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना छाप्यात काहीच हाती लागले नाही. मात्र, ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी या कारवाईचे समर्थन करण्यासाठी घरात असलेल्या सरकारी निवेदनाच्या प्रती उचलून नेल्या, असे चिदंबरम यांनी सांगितले. तसेच सीबीआय किंवा पोलिसांनी याप्रकरणात अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही, या मुद्द्याकडेही त्यांनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले.

‘ईडी’ने गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात केलेल्या तपासानंतर काही बाबी मांडल्या होत्या. त्यामध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांनी परकीय गुंतवणूक विकास महामंडळाला कक्षेबाहेर जाऊन मंजूरी दिल्याचे म्हटले होते. या प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तसेच पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला २००७ मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त ४.६२ कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी ३०५ कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं कार्ती चिदंबरम यांची १.१६  कोटींची संपत्ती जप्त केली असून, बँक अकाऊंट आणि एफडीही गोठवली आहेत.