प्रतिकूल परिस्थितीत जीव धोक्यात घालून देशाची सेवा करणाऱ्या केंद्रीय सशस्र पोलीस दलास सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी केले. केंद्रीय पोलीस दलाच्या वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीय पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगक सुरक्षा दल आणि इतर सुरक्षा दले अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतात. सुरक्षा दलातील कर्मचारी दीर्घकाळ आपल्या कुटुंबांपासून लांब कुठेतरी कर्तव्य बजावत असतात. अशावेळी त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या सर्वोत्तम सुविधा पुरविण्यासाठी वैद्यकीय विज्ञान संस्थेचा मोलाचा हातभार लाभेल, असे पंतप्रधान म्हणाले. या सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची योग्य ती देखभाल केल्यास त्याचा निश्चितच चांगला परिणाम सुरक्षा जवानांवर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने १२६ अतिरिक्त तुकडय़ा मंजूर केल्या आहेत. त्यापैकी ७१ तुकडय़ा कार्यन्वित झाल्या असून उर्वरित तुकडय़ांच्या निर्मितीचा निर्णय येत्या आर्थिक वर्षांत घेतला जाईल, असे पंतप्रधानांनी म्हटले.
सुरक्षा दलांना अधिक सक्षम करण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. सन २००८ पासून संरक्षण दलासाठी नवीन २४ प्रशिक्षण केंद्रे ेसुरू करण्यात आली असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.