मुंबईत उघडकीस आलेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूरचित्रवाणी गुणांक पद्धतीचा (टीआरपी) फेरआढावा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने बुधवारी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी हेम्पती यांची चार सदस्यीय समिती स्थापन केली. ही समिती दोन महिन्यांत मंत्रालयाला अहवाल सादर करेल. त्यानंतर टीआरपीसंदर्भातील नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.

पैसे देऊन एखाद्या दूरचित्रवाणी वाहिन्यांचा टीआरपी वाढवण्याचा गैरप्रकार समोर आला असून त्याची व्याप्ती देशभर असण्याची शक्यता मानली जाते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने आत्तापर्यंत दहा जणांना अटकही केली असून काही वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. या घोटाळ्याची गंभीर दखल घेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सध्या अमलात आणल्या जात असलेल्या ‘टीआरपी’ पद्धतीतील त्रुटी, त्यातील पळवाट, संभाव्य गैरव्यवहार आदी विविध मुद्दय़ांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

टीआरपीची विद्यमान यंत्रणा (रेटिंग एजन्सी) २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कार्यरत आहे.  गेल्या सहा वर्षांत दूरचित्रवाणी क्षेत्रात झालेल्या बदलानुरूप रेटिंग व्यवस्थेतही सुधारणा करण्याची गरज आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) रेटिंगची व्यवस्था अधिक पारदर्शी करण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. ‘ट्राय’ने केलेल्या शिफारशी, दूरचित्रवाणी क्षेत्रातील आर्थिक, तांत्रिक सद्यस्थिती, या क्षेत्रातील विविध घटकांची मते-शिफारशी, त्यांच्या अपेक्षा-गरजा विचारात घेतल्या जातील, असे मंत्रालयाने  नमूद केले आहे.

* संसदीय समितीतील प्रदीर्घ चर्चेनंतर २०१४ मध्ये लागू केलेल्या सूचना करण्यात आल्या होत्या. टीआरपीसंदर्भात माहिती व प्रसारण मंत्रालयाने समितीही नेमली होती.

* ही समिती तसेच ट्रायच्या शिफारशीच्या आधारे रेटिंग एजन्सींसाठी मार्गदर्शक सूचना बनवल्या गेल्या होत्या.

* शशी हेम्पती यांच्या नव्या समितीत आयआयटी कानपूरच्या गणित व संख्याकी विभागाचे प्राध्यापक डॉ. शलभ, सी-डॉटचे कार्यकारी संचालक डॉ. राजकुमार उपाध्याय, ‘सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी’तील निर्णय विज्ञानचे (डिसिजन सायन्सेस) प्रा. पुलक घोष हे सदस्य असतील. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना विशेष निमंत्रक असतील.

* रेटिंग व्यवस्थेसंदर्भातील यापूर्वी केलेल्या शिफारशींचा अभ्यास करणे, प्रामुख्याने ‘ट्राय’च्या शिफारशींचा अभ्यास करणे, विद्यमान मार्गदर्शक सूचनांचे मूल्यमापन करणे, रेटिंग व संबंधित मुद्दय़ांची माहिती घेऊन त्याचे विश्लेषण करणे हे समितीचे कार्यक्षेत्र असेल.