पठाणकोट हवाई दलाच्या तळावर अलीकडेच करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर देशातील संरक्षण दलांच्या तळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करीत आहे. संरक्षण दलांच्या कोणत्या तळांना कितपत धोका आहे त्याचा आढावा या समितीच्या वतीने घेण्यात येणार आहे.

देशातील संरक्षण दलांच्या तळांचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना सुरक्षेचा सविस्तर आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तळावर कोणत्या त्रुटी आहेत याची तपासणीही करण्यास सांगण्यात आले आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी येथे सांगितले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त एनसीसीचे शिबीर आयोजित करण्यात आले असून त्या शिबिराला पर्रिकर यांनी भेट दिली तेव्हा ते वार्ताहरांशी बोलत होते. या समितीची रचना कशी असेल याबाबत सविस्तर माहिती देण्यास संरक्षणमंत्र्यांनी नकार दिला, मात्र त्याबाबत येत्या दोन-चार दिवसांत अधिसूचना जारी केली जाईल, असे ते म्हणाले.

या कामासाठी एक विशेष पथक तयार केले जाणार आहे, कदाचित पुढील आठवडय़ापर्यंत हे पथक सक्रिय होईल. सदर पथक देशातील संरक्षण दलाच्या तळांना भेटी देईल आणि कोणत्या तळाला कितपत धोका आहे, ती कितपत संवेदनक्षम आहेत याची तपासणी करील. त्याचप्रमाणे पथकातील सदस्य तळावरील प्रमुख अधिकाऱ्याशीही चर्चा करतील, असेही पर्रिकर म्हणाले.

केवळ हवाई दलाचे तळच नव्हे तर देशातील संरक्षण दलांच्या सर्व तळांबाबत ही खबरदारी घेण्यात येणार आहे. संबंधित तळाला कोणता धोका आहे आणि तो दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

संरक्षण दलांच्या तळांचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले असले तरी त्यामुळे पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीच्या प्रक्रियेत कोणतीही बाधा येणार नाही, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू असलेल्या चौकशीत अडथळे येणार नाहीत. त्यांना त्यांचे काम पूर्ण करू दिले जाईल आणि आम्ही आमच्या पद्धतीने विश्लेषण करू, असेही पर्रिकर यांनी स्पष्ट केले.

पठाणकोट हल्ल्यानंतर पर्रिकर यांनी, आता सहनशक्ती संपली, असे वक्तव्य केले होते, त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, याचा अर्थ आम्ही सामर्थ्यांत वाढ करीत असून तो रणनीतीचा भाग आहे आणि त्याबाबत जाहीर चर्चा करता येणार नाही.