करोना लसीकरण मोहिमेत समन्वयासाठी आणि देखरेख ठेवण्यासाठी समित्या स्थापन कराव्यात आणि या मोहिमेमुळे नियमित आरोग्यसेवांमध्ये फारसे अडथळे येणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना केल्या.

लसीकरण मोहिमेवरील संभाव्य विपरीत परिणाम टाळण्यासाठी समाजमाध्यमांवरून प्रसारित आणि अग्रेषित करण्यात येणाऱ्या अफवांचाही वेळीच बंदोबस्त करावा, असेही केंद्र सरकारने राज्यांना कळवले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठविले आहे.

करोना लसीकरण मोहीम जवळपास वर्षभर चालणार आहे. त्यामध्ये अनेक गट सहभागी होतील. लसीकरण मोहिमेची सुरुवात आरोग्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांपासून होणार आहे. त्यामुळे राज्य आणि जिल्हा पातळीवर समित्यांची स्थापना करावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचित केले आहे.

राज्यांच्या समित्यांनी शीतगृहांची सज्जता करावी, कार्यवाहीचे नियोजन करावे आणि आपल्या पुढील आव्हानांचा विचार करून अगदी दुर्गम भागांतही पोहोचता येईल, अशी रणनीतीही राज्यांनी आखावी, असेही आरोग्य मंत्रालयाने सूचना देताना स्पष्ट केले आहे.

समित्या कोणत्या? कामे काय?

* राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुकाणू समिती स्थापन करावी.

* अतिरिक्त मुख्य सचिव अथवा आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची स्थापना करावी.

* जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करावी.

* लस उपलब्ध झाल्यावर मोहिमेतील लोकसहभाग वाढवण्यासाठी सर्व संबंधित विभागांचा सक्रीय सहभाग वाढवा.

* समाज माध्यमांवरून लशीबद्दल गैरसमज पसरवणारी खोटी माहिती किंवा अफवांचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

रुग्ण दुपटीचा काळ १५७ दिवसांवर

मुंबई : मुंबईमधील रुग्ण दुपटीच्या कालावधीत अवघ्या १० दिवसांत ५७ दिवसांनी वाढ झाली. आता हा कालावधी सरासरी १०० दिवसांवरून १५७ दिवसांवर गेला आहे. हा कालावधी २० ऑक्टोबरला १०० दिवसांहून अधिक झाला होता. गणेशोत्सवादरम्यान बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीमुळे रुग्णसंख्येत वाढ झाली होती.

महिनाभरात ६० टक्के रुग्णघट

मुंबई : करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या महिनाभरात सुमारे ६० टक्के घट झाली आहे. मात्र दिवाळीतील गर्दी आणि हिवाळ्यामुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तापमान १० अंश सेल्सिअस खाली येते, अशा भागांमध्ये प्रादुर्भावाचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केली