करोनाची लस शोधण्यासंदर्भात काम करणाऱ्या संशोधकांनी एक दिलासादायक बातमी दिली आहे. कॉमन कोल्ड म्हणजेच सर्दीमुळे करोना संसर्गापासून काही प्रमाणात प्रतिकार होतो असा दावा संशोधकांनी केला आहे. सर्दी झाल्यानंतर शरीरामध्ये तयार होणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीचा फायदा पुढील १७ वर्षांपर्यंत होतो असा दावा संशोधकांनी केला आहे. ज्या ज्या व्यक्तींना सर्दी झाली आहे त्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अगदीच किरकोळ किंवा नसल्याप्रमाणेच आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. या संशोधनासंदर्भातील वृत्त ब्रिटनमधील मीरर डॉट युके, द सन या वेबसाईट्सने दिलं आहे.

सिंगापूरमधील ड्युक एनयूएस मेडिकल स्कूलमधील इम्युनोलॉजी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती संदर्भात अभ्यास करणाऱ्या विभागाचे प्रमुख प्राध्यापक अंतोनियो ब्रेतोलेती यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संशोधकांनी सर्दी झालेल्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचा दावा केला आहे. सर्दी झाल्यानंतर शरीरीमध्ये जी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते त्यामुळे करोनाचा संसर्ग होण्यापासून किंवा करोना विषाणूचा परिणाम होण्यापासून अधिक संरक्षण होते. या संशोधनामध्ये सर्दीवर मात करण्यासाठी शरीरामध्ये तयार हणाऱ्या टी सेल्सच्या फायद्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. हे टी सेल्स करोनाविरुद्ध लढण्यासाठी फायद्याचे असतात असं सांगण्यात आलं आहे. या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार बीटा करोना विषाणू ज्यामध्ये ओसी ४३ आणि एचकेयूवनमुळे आपल्याला सर्दी आणि छाती दुखण्याचा त्रास होतो. या विषाणूंची रचना करोना, सार्स आणि मेरसच्या विषाणुंसारखीच असते. या सर्व विषाणूंचा संसर्ग प्राण्यांमधून माणसांमध्ये होतो.

करोना ज्या प्रकारचा विषाणू आहे त्याच प्रकारच्या विषाणूमुळे ३० टक्के लोकांना सर्दी होते. मात्र या विषाणूंमुळे केवळ सर्दीच नाही तर इतर धोकादायक आजारांची शक्यता असते. या अशा विषाणूंपासून संरक्षण करण्याचे काम शरीरामधील टी सेल्स करतात. हे टी सेल्स मानवाच्या शरीरामध्ये मागील अनेक शतकांपासून नैसर्गिकरित्या निर्माण झालेले आहेत. करोनाच्या विषाणूचा जनुकीय रचना ही या सर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंप्रमाणेच असते. हे विषाणू शरीरामध्ये गेल्यानंतर टी सेल्स आपलं काम सुरु करतात आणि या विषाणूंवर मात करतात. या विषाणूंचा नाश करणे किंवा त्यांचा परिणाम कमी होण्यासाठी या टी सेल्स खूप महत्वाची भूमिका बजावतात. करोना आणि सार्स विषाणूंवरही या टी-सेल्सचा परिणाम होतो, असं संशोधक सांगतात.

टी सेल्स हे शरीरामधील पांढऱ्या पेशींचाच एक भाग आहे. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे हे टी सेल्स दुसऱ्या फळीतील संरक्षक कवच असल्यासारखे काम करतात. सर्दीसारख्या विषाणूंबरोबर काही आठवड्यांपर्यंत लढा देण्याची क्षमता या टी सेल्समध्ये असते. अंतोनियो यांनी केलेल्या दाव्यानुसार ज्याप्रकारे मागील काही शतकांमध्ये मानवाच्या शरीरामध्ये सर्दी विरोधात लढण्यासाठी टी सेल्सची निर्मिती झाली त्याच प्रमाणे भविष्यात मानवी शरीरामध्ये करोनाविरुद्ध लढणाऱ्या टी सेल्सची निर्मिती होईल. असे टी सेल्स निर्माण झाल्यानंतर करोनाच्या संसर्गाचा धोका कमी होऊन करोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. संशोधनामध्ये अंतोनियो यांच्या टीमने करोनाच्या २४ तर सार्सच्या २३ रुग्णांवर संशोधन केलं. यापैकी सर्दी झालेल्या रुग्णांना या विषाणूंचा जास्त चांगल्याप्रकारे सामना केल्याचे दिसून आलं.