गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने चांगली कामगिरी नोंदवली. भारताने या खेळांमध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य पदाकांसह एकूण ६६ पदकांची कमाई केली. २०१४ मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेल्या ६४ पदकांच्या तुलनेत यंदाची भारतीय खेळाडूंची कामगिरी अव्वल ठरली. गोल्ड कोस्टमध्ये भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये एकूण १०१ पदकांची कमाई केली होती. तर २००२मध्ये मँचेस्टर येथील स्पर्धेमध्ये ६९ पदके मिळवली होती.
भारतासाठी नेमबाजीचा इव्हेंट खुपच चांगला राहिला. नेमबाजीत यावेळी भारतीय नेमबाजांनी ७ सुवर्ण पदकांसह १६ पदके कमावली. अनिश भानवाला, मेहुली घोष आणि मनू भाकर यांसारख्या तरुण नेमबाजांशिवाय हिना सिद्धू, जितू राय आणि तेजस्विनी सावंत यांसारख्य अनुभवी नेमबाजांनीही भारतासाठी पदके जिंकली. मात्र, गगन नारंगसाठी यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा खास राहिली नाही.
वेटलिफ्टिंगमध्ये भारताने एकूण ९ पदके कमावली. यामध्ये ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश होता. मीराबाई चानू, संजीता चानू यांनी भारताला सुवर्ण पदके मिळवून दिली. त्याशिवाय पूनम यादवने देखील भारतासाठी सुवर्ण जिंकले.
कुस्ती स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी निराश केले नाही. भारताने ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह एकूण १२ पदके कमावली. बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक, सुमित या पहलवानांनी आपापल्या वजनी गटात भारताला पदके मिळवून दिली.
बॅडमिंटनमध्ये भारताने एकूण ६ पदके जिंकली. भारताने मिश्र प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. तसेच महिला एकेरीमध्ये सायना नेहवालने भारताच्याच पी. व्ही. सिंधूला हारवत सुवर्ण आपल्या नावावर नोंदवले. तर पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांला अंतिम फेरीत ऑलंपिक रौप्य पदक विजेता मलेशियाचा खेळाडू के. ली. चेंग वेई ने धोबीपछाड दिली.
त्याचबरोबर टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला आणि पुरुषांच्या संघाने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. त्याचबरोबर महिलांच्या एकेरीमध्ये मणिका बत्राने सुवर्ण जिंकले. तर पुरुष एकेरी आणि महिला एकेरीच्या स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळाले.
बॉक्सिंगमध्ये भारताने एकूण ९ पदके पटकावली. यामध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य तर ३ कांस्य पदके जिंकली. यामध्ये मेरी कोमने सुवर्ण जिंकून दाखवले की, वय आपल्यातील प्रतिभेला रोखू शकत नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 15, 2018 11:36 am