13 August 2020

News Flash

राष्ट्रकुल पथदीप घोटाळ्यात सहा जणांना सक्तमजुरी

राष्ट्रकुल स्पर्धाच्या वेळी पथदीप बसवण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणात दिल्ली महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांसह पाचजणांना चार वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकीय

राष्ट्रकुल स्पर्धाच्या वेळी पथदीप बसवण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणात दिल्ली महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांसह पाचजणांना चार वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकास सहा वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. २०१० मधील राष्ट्रकुल स्पर्धात आरोपींना शिक्षा झालेला हा पहिलाच खटला आहे. इतर प्रकरणे अजून बाकी आहेत.
राष्ट्रकुल पथदीप घोटाळ्यात सरकारला १.४२ कोटी रुपयांचा फटका बसला होता. सीबीआयचे विशेष न्यायाधीश ब्रिजेश गर्ग यांनी दिल्ली महापालिकेचे अधीक्षक अभियंता डी. के. सुगन, कार्यकारी अभियंता ओ. पी. महला, लेखापाल राजू व्ही व निविदा लिपीक गुरुशरण सिंग, स्वेका पॉवरटेक इंजिनियरिंग प्रा. लि. चे संचालक जे. पी. सिंग यांना चार वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा दिली. या पाचजणांवर गुन्हेगारी कट, फसवणूक व बनावट कागदपत्रांचा वापर तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात ते दोषी सिद्ध झाले आहेत. संबंधित कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक टी. पी. सिंग यांना सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.
न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर आहे, त्यांनी संगनमताने महापालिकेला फसवले. त्यात बनावट कागदपत्रे, बनावट नोंदवह्य़ा यांचा वापर केला. यातील कंपनीला ७० हजार रुपये दंड केला असून महापालिका अधिकाऱ्यांना प्रत्येकी ३० हजार रुपये, तर टी. पी. सिंग यांना ४२ हजार, जे. पी. सिंग यांना २२ हजार रुपये दंड केला आहे. सहाही आरोपी न्यायालयात हजर होते. या आरोपींमुळे महापालिकेला १.४२ कोटींचा फटका बसला आहे त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असा युक्तिवाद सीबीआयचे वकील प्रणीत शर्मा यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2015 3:26 am

Web Title: commonwealth street light scam
Next Stories
1 बाहेरख्यालीपणाला ऑनलाईनवर मोकळी वाट
2 पाकिस्तानकडून काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रातील परिषदेत उपस्थित
3 टायगर मेमन नव्हे फरकानला अटक
Just Now!
X