दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये जनमत एकवटले असले तरी पॅरिस आणि लगतच्या उपनगरांतील मुस्लिमबहुल समाजात अस्वस्थतेचे वातावरण आहे. या हल्ल्याच्या निषेधात काही मशिदींलगत गुरुवारी किरकोळ स्फोट व गोळीबार झाल्याने बुधवारच्या हल्ल्याने फ्रान्समधील धार्मिक सौहार्दाला धक्का पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बुधवारच्या हल्ल्यापाठोपाठ गुरुवारी पॅरिसलगत एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात एक महिला पोलीस ठार झाल्याने देशात पुन्हा तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे या हल्लेखोराने अंगात बुलेटप्रूफ जाकिट घातले होते, त्यामुळे हादेखील दहशतवादी हल्लाच असल्याचे पोलीस मानत आहे. या फरारी हल्लेखोराचाही जोरदार शोध सुरू आहे.
बुधवारच्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात फ्रान्समध्ये राष्ट्रीय दुखवटा पाळला जात आहे. देशभरात राष्ट्रीय ध्वज अध्र्यावर उतरवण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत पॅरिसमध्ये जनतेने दोन मिनिटे शांतता पाळून मृतांना श्रद्धांजली वाहिली.
पॅरिसमध्ये ८०० जादा पोलीस तैनात झाले आहेत. वृत्तपत्र कार्यालये, धार्मिक स्थळे व रेल्वेस्थानकांवर बंदोबस्त कमालीचा वाढविण्यात आला आहे. काही मशिदींलगत गुरुवारी किरकोळ स्फोट झाले आणि त्यात कोणीही जखमी झाले नसले तरी धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी सरकार पावले उचलत आहे.