भारताला ‘हिंदू पाकिस्तान’ करण्याकडे सध्या कल वाढत असल्याची भीती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त करत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. देशात ‘जातीयवाद छोडो’ आंदोलनाचे आयोजन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.  ‘चले जाव’ चळवळीच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. चले जाव आंदोलनात हिंदू, मुस्लिम, दलित, ब्राह्मण आणि राजपूत आदी सहभागी झाले होते, हे सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे, हे सांगत त्यांनी या एकतेमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे ठासून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत ते म्हणाले, पंतप्रधान म्हणाले की, भारतासाठी १९४२ ते १९४७ पर्यंतचा पाच वर्षांचा कालावधी खूप महत्वाचा होता. त्यांनी २०१७ ते २०१२२ साठी काही लक्ष्य निश्चित केले आहेत. आम्ही त्या पाच वर्षांत देशाचे विभाजन पाहिले. त्यावेळी देशात जातीयवादाचे ध्रुवीकरण झाले. त्याचा परिणाम देशाच्या फाळणीत पाहायला मिळाला, असा उपहासात्मक संदर्भ त्यांनी दिला.

देशात बेरोजगारी वाढवणारी नवउदारवादी नीती भारताने सोडायला हवी. यामुळे गरीबी वाढत आहे आणि देशातील श्रीमंत आणि गरीबांतील दरी विस्तारत आहे. अशा प्रकारच्या नीतीमुळेच दोन प्रकारचा भारत तयार होत आहे. एक गरिबांसाठी आणि दुसरा श्रीमंतांसाठी. आम्ही १९४७ मध्ये अशा भारताचे स्वप्न पाहिले होते, का असा सवाल त्यांनी या वेळी विचारला.

ब्रिटिश सरकारविरोधात अनेक कम्युनिस्ट नेत्यांचे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी निर्दशनास आणून दिले. सेल्यूलर तुरूंगात कैद राहिलेल्यांमधील अनेक कम्युनिस्ट नेते हे बंगाल आणि पंजाबमधील होते. कोणी एकाने स्वातंत्र्याचे आंदोलन हडपण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लादेखील त्यांनी याप्रसंगी दिला.