News Flash

भारतात समूह संसर्ग, लोकांनी काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारनं सत्य स्वीकारावं; तज्ज्ञांची सूचना

"जर हा समूह संसर्ग नसेल, तर मग काय आहे?"

संग्रहित

देशातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे समूह संसर्ग झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं समूह संसर्ग झाल्याचा वृत्त फेटाळून लावलं होतं. मात्र, देशात समूह संसर्ग झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला. सरकारच्या अडथळ्यामुळे हे सत्य स्वीकारलं जात नाही. समूह संसर्ग झाल्याचं सत्य केंद्र सरकारनं स्वीकारावं, जेणेकरून लोक गैरसमजात राहणार नाही, अशी सूचना तज्ज्ञांनी सरकारला केली आहे.

करोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला होता. चार टप्प्यानंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली. मात्र, दुसरीकडं करोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे समूह संसर्ग झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, आयसीएमआरनं हा दावा फेटाळून लावला होता. आयसीएमआरनं वृत्त फेटाळल्यानंतर देशातील तज्ज्ञ डॉक्टरांनी देशातील अनेक भागांमध्ये समूह संसर्ग झाला असल्याचा दावा केला आहे. ‘पीटीआय’नं हे वृत्त दिलं आहे.

‘एम्स’चे (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा यांनी आयसीएमआरनं केलेल्या पाहणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “देशातील अनेक भागात समूह संसर्ग झालेला आहे, यात कसलीही शंका नाही. देशातून लॉकडाउन शिथिल केल्यानंतर व लोकांची गर्दी बाहेर पडू लागल्यानं रुग्णांची संख्या वेगात वाढली आहे. त्याचबरोबर ज्या भागात एकही रुग्ण नव्हता, तिथेही करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलं आहे. आयसीएमआरच्या पाहणीत सध्याची परिस्थिती दिसून आलेली नाही. सरकारनं पुढे येऊन समूह संसर्ग झाल्याचं मान्य करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोक गैरसमजात राहणार नाही आणि अधिक काळजी घेतील,” असं मिश्रा यांनी सांगितलं.

विषाणूशास्त्रज्ञ शहीद जमील म्हणाले,”देशात समूह संसर्गाला खूप आधीच सुरूवात झाली आहे. आरोग्य यंत्रणा ही गोष्ट मान्य करत नाही, ही वेगळी बाब आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आयसीएमआरनं स्वतः केलेल्या पाहणीत हे दिसून आलं आहे. करोना बाधित निघालेले ४० टक्के रुग्णांची कोणतीही ट्रॅव्हलिंग हिस्ट्री नाही. त्याचबरोबर ते करोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याचीही नोंद नाही. जर हा समूह संसर्ग नसेल, तर मग काय आहे?,” असा सवाल जमील यांनी केला आहे.

दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. अरविंद कुमार यांनीही समूह संसर्ग झाल्याचा दाव्याला दुजोरा दिला. “आयसीएमआरचं म्हणणं एकवेळ स्वीकारलं, तरी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद यासारख्या ठिकाणी समूह संसर्ग झालेला नाही. हे नाकारता येणार नाही. भारत विस्तीर्ण देश आहे. प्रत्येक राज्यात करोनाचा वेगळा अनुभव येत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या वेळी प्रादुर्भाव होत आहे,” असंही कुमार यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 3:44 pm

Web Title: community transmission of covid 19 on in many parts of india bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Video: …अन् पोलिसांनी भिंतीवर चढून बंगल्यात प्रवेश करत केली आमदाराला अटक
2 “मोदीजी, गाडीला चार चाकं असतात अन्…”; कपिल सिब्बल यांचा पंतप्रधानांना टोला
3 प्रियांका गांधीवर टीका करणाऱ्या महिला आमदाराने सोडले काँग्रसचे सर्व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप
Just Now!
X