राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये सामाजिक दायीत्व उपक्रम अर्थात ‘सीएसआर’वर ११,९६१ कोटी रुपये खर्च केले, जे आधीच्या वर्षांच्या तुलनेत १८ टक्के अधिक होते. २०१७-१८ मध्ये याच कंपन्यांनी १०,१७९ कोटी रुपये खर्च केले होते. उल्लेखनीय म्हणजे या रकमेपैकी ४,४४० कोटी रुपये हे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर कंपन्यांकडून खर्च करण्यात आले आहेत.

एनएसई आणि प्राइम डेटाबेस यांनी संयुक्तपणे स्थापित केलेल्या ‘एनएसई इन्फोबेस डॉट कॉम’ या कंपनीने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, एनएसईवर सूचिबद्ध कंपन्यांकडून मागील पाच वर्षांत, सामाजिक उपक्रमांवरील खर्चात वार्षिक सरासरी १७ टक्के दराने दमदार वाढ होत आली आहे. विविध सामाजिक उपक्रमांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या अव्वल १० कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, इंडियन ऑइल, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, इन्फोसिस, टाटा स्टील, आयटीसी, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. या १० कंपन्यांचा एकूण खर्चात ३६ टक्के वाटा असल्याचे ‘एनएसई इन्फोबेस’चा अहवाल सांगतो.

या अहवालानुसार, कायद्याने बंधनकारक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ‘सीएसआर’वर खर्च करणाऱ्या एनएसईवर सूचिबद्ध कंपन्यांची संख्या ४८८ इतकी आहे. शिवाय, ३७ कंपन्यांनी तोटा नोंदविला असताना, सरलेल्या आर्थिक वर्षांत सीएसआर उपक्रमांवर खर्च सुरू ठेवला असल्याचे दिसून येते.

एनएसईवर सूचिबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून २०१८-१९ मध्ये सामाजिक उपक्रमांवरील खर्चात ४ टक्क्य़ांची वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये ५४ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून २,७१० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, तर २०१८-१९ मध्ये ५७ सावर्जनिक क्षेत्रातील कंपन्यांनी याकामी ३,१९८ कोटी रुपये खर्च केले आहेत. ३१ मार्च २०१९ अखेर एनएसईवर सूचिबद्ध कंपन्यांची संख्या १,७८६ इतकी आहे, त्यापैकी हा अहवाल तयार करण्यासाठी १,१३२ कंपन्यांची कामगिरी लक्षात घेण्यात आली आहे.