ग्राहकांची फसवणूक करणे, उत्पादनाची गुणवत्ता कायम न राखणे, ग्राहकांना खोटी आश्वासने देणे, उत्पादनाच्या मूळ किंमतीपेक्षा अतिरिक्त रक्कम उकळणे, असे गैरधंदे करणाऱ्या कंपन्यांना ‘बॅड कंपनी’ पुरस्काराने राष्ट्रीय पातळीवर ‘सन्मानित’ केले जावे, असा अभिनव प्रस्ताव केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने मांडला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर अशा कंपन्यांची नामांकने ग्राहकांना वा ग्राहकहितासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना केंद्र सरकारकडे पाठवता येतील आणि राष्ट्रीय पातळीवरील या ‘प्रसिद्धी’मुळे अशा कंपन्यांना चांगलाच चाप बसण्याची शक्यता आहे.
‘बॅड कंपनी’ पुरस्कार योजनेसाठी या मंत्रालयाने निश्चित केलेल्या नियमावलीची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. मोठय़ा प्रमाणावर जनतेशी संबधित असलेली, परंतु गुणवत्ता नसलेली भिकार उत्पादने निर्माण करणाऱ्या कंपन्यांना चाप लावण्यासाठी ही अभिनव शक्कल लढविण्यात आली आहे. भिकार उत्पादन, गुणवत्तेचे निकष न पाळणे, खोटे कारण सांगून छुपी रक्कम ग्राहकांकडून उकळणे, ग्राहक व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव, खोटी आश्वासने व खोटे दावे करणे, ग्राहकांची दिशाभूल करणे, पर्यावरणाचे उल्लंघन, असे  निकष निश्चित केले आहेत. यापैकी कोणत्याही निकषासाठी ‘पात्र’ कंपनीचे नामांकन कुणाही ग्राहकास वा संस्थेस करता येईल.
या निकषांवर नामांकन झालेली कंपनी व उत्पादनांची मंत्रालयातील सचिव स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या पॅनलमार्फत चाचणी करण्यात येईल. या कंपन्यांना सुधारण्यासाठी एक संधीही दिली जाईल. कंपनीला सूचना देऊन सुधारण्यासाठी ‘कानमंत्र’ दिला जाईल. तरीही सुधारणा झाली नाही तर अशा कंपनीला प्रतिष्ठेचा ‘बॅड कंपनी’ पुरस्कार जाहीर केला जाईल.

इंग्लंडचा कित्ता..
‘बॅड कंपनी’ पुरस्कार ही संकल्पना मूळची इग्लंडची. तेथे गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना सुरू आहे. याशिवाय ‘चॉईस शॉन्की’ या नावाने ऑस्ट्रेलियात हा पुरस्कार दिला जातो. ‘शॉन्की’ म्हणजे अविश्वसनीय, अयोग्य, अप्रामाणिक व गुणवत्ता नसलेला! त्याच धर्तीवर आता आपल्याकडेही असा पुरस्कार देण्याचा हा अभिनव प्रस्ताव आहे.