दहशतवादी संघटनेशी संबंधित कंपनीकडून दहा कोटींची देणगी मिळाल्याप्रकरणी भाजपावर टीका होताना दिसत आहे. अस असतानाच आता भाजपाने देणगी देणाऱ्या कंपन्यांना सरकारी कंत्राटं दिल्याची माहिती उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अगदी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाशी संबंधित कामेही ज्या कंपन्यांना देण्यात आली आहेत त्या कंपन्या भाजपाच्या देणगीदार आहेत.

गुजरातमधील बांधकाम श्रेत्रातील क्युब कन्स्ट्रक्शन इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सन २०१२-१३ आणि २०१७-१८ दरम्यान भाजपाला ५५ लाखांची देणगी दिली होती. नंतर याच कंपनीला राज्यातील भाजपा सरकारने वडोदरा रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये पश्चिम रेल्वेच्या कंप्युटराइज आरक्षण केंद्र उभारण्याचा कंत्राट दिले होते. यासाठी सरकारने खरेदी केलेल्या जमीनीचा तुकडा कंपनीला दिला आहे. त्यानंतर अशाप्रकारची कंत्राटं अनेक शहरांमध्ये कंपनीला देण्यात आली.

कंपनीच्या वेबसाईटवरील आकडेवारीच्या आधारे गुजरातमधील भाजपा सरकराने ‘क्युब कन्स्ट्रक्शन’ला अनेक कंत्राटं दिली असल्याचे उघडत होत आहे असं ‘द क्विंट’ने म्हटलं आहे. यामध्ये गुजरात औद्योगिक विकास प्रधिकरण, गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्था, गुजरात शहरविकास प्रधिकरण आणि गुजरात शिक्षण विभागाशी संबंधित कामांचा समावेश आहे.

‘क्युब कन्स्ट्रक्शन’ला राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारशी संबंधित प्रकल्पांचीही कंत्राटं देण्यात आली आहेत. ओएनजीसी, बीएसएफ आणि इस्रोची राज्यातील सर्व कंत्राटं याच कंपनीला देण्यात आली आहेत. इतकचं नाही तर या प्रकल्पांचे उद्घाटनही भाजपाच्या बड्या नेत्यांच्या हस्तेच करण्यात आली आहेत. एका प्रकल्पाचे उद्घाटन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. तर एका प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलही उपस्थित होते. ‘क्युब कन्स्ट्रक्शन’च्या वेबसाईटनुसार या कंपनीचे कार्यकारी अधिकारी संजय शाह असून कंपनीची स्थापना १९९६ साली झाली आहे.

केवळ ‘क्युब कन्स्ट्रक्शन’च नाही तर इतर दोन कंपन्यांबद्दलही अशीच माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई अहमदाबाद प्रकल्पाशी संबंधित कंत्राटं या दोन्ही कंपन्यांना देण्यात आली आहेत. भाजपाला देणगी देणाऱ्या के. आर सावणी या कंपन्यांनीला बुलेट ट्रेनच्या मार्गावरील वडोदरा रेल्वे स्थानकातील वेगवेगळ्या इमारतींच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीने २०१२-१३ साली भाजपाला दोन लाखांची देणगी दिली होती.

याशिवाय धनाजी पटेल नावाच्या एका ठेकेदारालाही बुलेट ट्रेनशी संबंधित कंत्राट देण्यात आले आहे. पटेल यांनी २०१७-१८ दरम्यान भाजपाला अडीच लाखांची देणगी दिली होती. या कंपनीला बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत वतवा ते साबरमती- डी केबीन मार्गातील वेगवेगळ्या बांधकामांचे कंत्राट देण्यात आले आहे. रचना इंटरप्रायझेस नावाच्या कंपनीला वडोदरा स्थानकाजवळील विद्युतीकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे. याच नावाच्या कंपनीने अनेकदा भाजपाला देणगी दिली आहे. मात्र देणगी देणारी आणि कंत्राट मिळालेली कंपनी एकच आहे का याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. भाजपानेच निवडणूक आयोगाला दिलेल्या विवरण पत्रामध्येच देणगीदार कंपन्यांची माहिती दिली आहे.