धुम्रपान करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार कामातून ब्रेक घेतला जातो. याचा उत्पादनावर परिणाम होत असल्याने जपानमधील एका कंपनीने एक भन्नाट योजना आखली आहे. जे कर्मचारी धुम्रपान करीत नाहीत त्यांच्यासाठी कंपनीने सहा दिवसांची अतिरिक्त रजा देण्याचे धोरण आणले आहे.

टोकियोमधील पियाला इनकॉर्पोरेशन नामक मार्केटिंग कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आणली आहे. या कंपनीचे कार्यालय २९ व्या मजल्यावर आहे. कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याला धुम्रपान करण्यासाठी ब्रेक घ्यायचा असेल तर त्याला थेट बेसमेंटमध्ये जावे लागते. यासाठी सर्वसाधारणपणे १५ मिनिटे जातात. त्यामुळे धुम्रपान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली की, धुम्रपानासाठीच्या ब्रेकमुळे कंपनीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.

या तक्रारीची दखल घेत कंपनीचे सीईओ टकाओ असुका यांनी धुम्रपान करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत धुम्रपान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक काम करावे लागत असल्याने याची नुकसान भरपाई म्हणून त्यांना अतिरिक्त सहा दिवसांची पगारी रजा देण्याचा निर्णय घेतला.

कंनपीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “आमच्या धुम्रपान न करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कंपनीच्या सजेशन बॉक्समध्ये एक चिठ्ठी टाकली. यामध्ये त्याने म्हटले की, स्मोकिंग ब्रेकमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. याचा उत्पादनावर परिणाम होत असून आमच्यावरही अन्याय होत आहे. या चिठ्ठीतील मजकुरावर आमच्या सीईओंचेही सहमत झाले. त्यामुळे कंपनीने धुम्रपान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सहा दिवसांची रजा देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर धुम्रपान बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे याासाठी इन्सेटिव्ह आणि दंडाच्या माध्यमातूनही प्रयत्न केला जात आहे.

टोकियो शहरात धुम्रपान करणाऱ्या लोकांचे प्रमाण खूपच वाढले असून आगामी २०२० मधील टोकियो ऑलिम्पकच्या पार्श्वभूमीवर शहर प्रशासनाने धुम्रपानविरोधी कायदाही मंजूर केला आहे.