पाकिस्तानात येत्या ११ मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होत असून लाहोरमधील एका मतदारसंघातील लढत ही आतापासूनच तेथे कुतुहलाचा विषय ठरली आहे. माजी कसोटीवीर आणि सध्याचा राजकीय नेता इम्रान खान आणि चित्रपट अभिनेत्री मीरा हे दोन सेलिब्रिटी निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकण्याची शक्यता आहे.
मीराची आई शफाकत जोहरा यांनी तशी शक्यता व्यक्त केली आहे. मीरा ज्या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे त्या मतदारसंघात गुलबर्ग, मॉडेल टाऊन, गार्डन टाऊन आणि फैझल टाऊन या उच्चभ्रू वस्तीचा समावेश आहे. पीएमएल-एन पक्षाकडे मीराने उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.
तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे इम्रान खान हे प्रमुख असून त्यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र शरीफ यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना आव्हान देण्यास इम्रान खान इच्छुक नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.