छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा मुलगा अमित जोगी यांनी सोमवारी विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांची आई आमदार रेणू जोगी यांच्या बद्दल मुख्यमंत्री बघेल यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याचे अमित यांनी म्हटले आहे. बिझनेस स्टॅर्ण्डडने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री बघेल यांनी अदानी समुहाच्या अधिका-यांबरोबर बंद दार आड चर्चा केल्यानंतर त्यावर अमित जोगी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर हा वाद प्रकाशझोतात आला आहे. अमित जोगी यांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील कोळसा खाणींच्या विक्री बद्दलही विचारले होते.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याबाबत सांगितले की, ते दररोज अनेकांना भेटतात तशाच प्रकारे ते अमित जोगी यांच्या आई आमदार रेणू जोगी यांच्याशी देखील भेटले. तर त्यांनी अमित जोगी यांच्यावर निशाणा साधत त्यांना आमच्या बैठकीची माहिती हवी असेल, असे म्हटले.
एक मुख्यमंत्री म्हणुन मी कोणाबरोबर बैठक करतो हे सर्वांना माहिती असते, अनेकजण मला भेटण्यास येतात. मी देखील अमित यांच्या आई आमदार रेणू जोगी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आता मी या बैठकीची माहिती सार्वजनिक करावी की नाही हे अमित यांनी सांगावे. असेही बघेल यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर टीक करत अमित यांनी म्हटले की, मुख्यमंत्री त्यांची निराशा बाहेर काढण्यासाठी विनाकारण या वादात माझ्या आईला घेत आहेत. आम्ही मुख्यमंत्री बघेल यांच्या विरोधात त्यांनी वरिष्ठ आमदार रेणू जोगी यांच्या बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बघेल यांनी रेणू जोगी यांच्याबद्दल केलेल्या निराधार आणि अस्पष्ट विधानामुळे समस्त नारी जातीचा अपमान झाला आहे. मी त्यांच्याशी एकट्याने भेटलो या बघेल यांच्या विधानाचा अर्थ काय आहे? असेही अमित यांनी विचारले आहे. शिवाय त्यांनी हे देखील सांगितले की, ते महिला अधिकार राष्ट्रीय आयोगास पत्र लिहुन मुख्यमंत्र्यांविरोधात कारवाईची मागणी करणार आहेत. पोलिसांनी देखील अमित यांच्या तक्ररीबद्दल योग्य ती कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

राज्य कॅबिनेट मंत्री काव्यासी लखमा यांनी सांगितले की, अमित आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टींचा अवलंब करीत आहेत. “आता अमित जोगीकडे काहीच नाही, त्यांना या रणनीतींनी राजकारणात राहायचे आहे,” असेही ते म्हणाले.