गझियाबादमध्ये ५ जून रोजी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेल्या पोस्टसंदर्भात अभिनेत्री स्वरा भास्कर, ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मनीष महेश्वरी आणि अन्य काही जणांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली असल्याचे गुरुवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

गझियाबादच्या लोणी परिसरात चार आरोपींनी आपल्याला मारहाण केली, आपली दाढी काढली आणि जय श्री राम अशी घोषणाबाजी करण्याची जबरदस्ती केली, असा आरोप एक वृद्ध मुस्लीम व्यक्ती करीत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर अपलोड करण्यात आला. तथापि, अब्दुल समद या मुस्लीम व्यक्तीने त्यांच्यावर जय श्री राम म्हणण्याची सक्ती करण्यात आल्याचा अथवा त्यांची दाढी कापण्यात आल्याचा आरोप आपल्या एफआयआरमध्ये केलेला नाही, असे गझियाबादच्या ज्येष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

टूलकिट प्रकरणी चौकशी

दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात कोविड टूलकिटप्रकरणी मनीष महेश्वरी यांनी चौकशी केल्याचे गुरुवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नसली तरी काही वापरकर्त्यांनी ‘फेरफार माध्यम’ असे ट्वीट केले त्याबाबतच्या कंपनीच्या धोरणाबद्दल महेश्वरी यांची चौकशी करण्यात आल्याचे कळते. कोविड टूलकिटबाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलेल्या ट्वीटवर फेरफार माध्यम असा ट्विटरने शिक्का मारला त्यानंतर ही चौकशी करण्यात आल्याचे कळते. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ३१ मे रोजी बंगळूरु येथे गेले होते.