अमेरिकन सरकारकडून एच-१बी व्हिसाच्या नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. त्यामुळे कॉम्प्युटर प्रोगामर्सना आता एच-१बी व्हिसा मिळणार नाही. परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या व्यक्तींना आवश्यक परवानग्यांसह अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचे अधिकार असलेल्या यूएससीआयएसने एच-१बी व्हिसाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

अमेरिकेत नोकरीसाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या व्हिसा प्रक्रियेत काहीतरी गडबड झाल्याचे म्हणत ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसाचे नियम आणखी कठोर करण्यास सुरुवात केली आहे. मागील सरकार या प्रकरणात बेजबाबदार असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. एच-१बीच्या गैरवापर होऊ नये, यासाठी कठोर भूमिका घेण्याचा संदेश व्हाईट हाऊसकडून देण्यात आला आहे. त्यामुळे न्याय विभागाने एच-१बी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या कंपन्यांना अमेरिकन लोकांबद्दल भेदभाव न बाळगण्याचे आदेश दिले आहेत.

‘न्याय विभागाने अमेरिकन कर्मचाऱ्यांविषयी भेदभाव बाळगून एच-१बी व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांची भूमिका खपवून घेतली जाणार नाही. अमेरिकन कर्मचाऱ्यांना वाईट वाईट स्थितीत ठेवता येणार नाही. अमेरिकन कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक मिळत असल्यास संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींना कठोर शासन करण्यात येईल,’ असे सिव्हिल राईट्स डिव्हिजनचे ऍक्टिंग असिस्टंट अॅटॉर्नी जनरल टॉम विइलर यांनी म्हटले आहे.

व्हिसा देण्याची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या यूएससीआयएसने एच-१बी व्हिसासाठी अर्ज करण्याचे नियम अधिकाधिक कठोर करणारी एक अधिसूचना जारी केली आहे. यामुळे अर्जदाराला सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे अर्जदाराला तो नोकरीसाठी उपयुक्त असल्याचे दस्तावेज द्यावे लागतील. फक्त पदवी दाखवून एच-१बी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्याला व्हिसा दिला जाणार नाही.

ट्रम्प प्रशासनाकडून ज्या नियमांवर अधिकाधिक जोर दिला जातो आहे, ते सर्व नियम अनेक दशकांपासून अस्तित्वात आहेत. मात्र मागील सरकारने या नियमांनुसार फारशी कारवाई केलेली नाही, असे ट्रम्प प्रशासनाला वाटते. मागील सरकारने नियमांचा कठोरपणे वापर केला नाही, असे व्हाईट हाऊसला वाटते. कायद्यांचा व्यवस्थित वापर न झाल्याने नोकऱ्यांसाठी उपयुक्त नसलेल्या लोकांनाही एच-१बी व्हिसा देण्यात आला, असे ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना वाटते.