आयसिसचा प्रमुख अबु बक्र अल बगदादी याला ठार मारण्याच्या अमेरिकी कमांडोजच्या मोहिमेत मोठी भूमिका पार पाडणाऱ्या कॉनन या श्वानाचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सन्मान केला आहे. या मोहिमेत कॉनन हाच खरा नायक ठरला आहे कारण त्याने बगदादीचा त्याच्या लपण्याच्या जागी जाऊन पाठलाग करीत तो तेथे असल्याची खात्री अमेरिकी कमांडोजना करून दिली होती.

बगदादी (४८) हा ऑक्टोबरमध्ये मारला गेला होता. अमेरिकी कमांडोजनी त्याच्याविरोधात मोहीम सुरू केली असता त्याने आत्मघाती स्फोट करून स्वत:ला संपवले होते. सीरियातील इडलिब प्रांतात तो लपलेला होता. या मोहिमेत मोठी भूमिका पार पाडणारा कॉनन हा श्वान बगदादीचा माग काढताना जखमी झाला होता. या श्वानाला सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये आणले गेले होते. ओव्हल कार्यालयात अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचे स्वागत केले. व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव स्टीफनी ग्रिश्ॉम, मेलनिया ट्रम्प व उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यासमवेत कॉननचे छायाचित्र घेतले गेले.  हा बेल्जियन मॅलीनॉइस प्रजातीचा श्वान असून त्याला आता जगात मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. कॉननला आपण मानपत्र दिले असे सांगून ट्रम्प म्हणाले की, तो अतिशय  बुद्धिमान व चतुर आहे. आयसिस प्रमुखाविरोधातील मोहीम त्याच्यामुळे सोपी झाली. त्याने अविश्वसनीय व फारच छान कामगिरी केली आहे.

कॉननला घेऊन व्हाइट हाऊसमध्ये घेऊन येणाऱ्यात त्याच्या नेहमीच्या प्रशिक्षकाचा समावेश नव्हता कारण तो प्रशिक्षक बगदादी विरोधी मोहिमेत सामील होता. त्यामुळे त्याला सार्वजनिक पातळीवर आणण्यात आले नाही.

मोहिमेचा नायक

ट्रम्प यांनी उत्तर सीरियात बगदादीला ठार मारण्याच्या मोहिमेतील जवानांचीही भेट घेतली. पण हे कमांडोज कोण आहेत हे जाहीर करण्यात आलेले नाही. बगदादी गेला पण त्याच्याविरोधातला हल्ला सहजगत्या करण्यात कॉनन या श्वानाची मोठी भूमिका होती असे ट्रम्प यांनी सांगितले. कॉननला तुम्ही दत्तक घेणार का या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळून ते म्हणाले की, तो अजून सेवेत आहे, निवृत्त झालेला नाही.