केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी आणि सिंचनासह अन्य संलग्न क्षेत्रांसाठी करण्यात आलेली एक लाख ६० हजार कोटी रुपयांची तरतूद पुरेशी असल्याचे सांगून केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी एक लाख ६० हजार कोटी, तर ग्रामीण विकासासाठी एक लाख २३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती तोमर यांनी दिली.

‘पंतप्रधान-किसान’सारख्या अनेक योजनांचा शेतकरी वर्गाला फायदा होत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी पुरेशी तरतूद केल्याबद्ल पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री सीतारामन यांचे आभार. आरोग्य, शिक्षण, कौशल्यविकास आणि स्वच्छ पाणीपुरवठा यावर भर दिल्याने महिला आणि मध्यम वर्गाला दिलासा मिळणार आहे.

-नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री.