निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा आज पूर्णपणे दिसून आला असून त्यांनी आपली सर्व निष्पक्षता गमावली अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी शरुर यांनी निवडणूक आयोगावर आज सडकून टीका केली. भाजपने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करुनही त्यांना कसलीही नोटीस पाठवण्यात आली नाही, यावरुन आयोगाने याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप थरुर यांनी केला आहे. ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानानंतर केलेल्या ‘रोड शो’वर काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली. काँग्रेस नेत्यांनी भाजपला यावरुन निशाणा करीत सडकून टीकाही करण्यात आली.


दरम्यान, मोदींच्या या कृतीतून आचारसंहितेचा कुठलाही भंग झालेला नाही. कारण मोदींनी त्यांच्या पक्षासाठी कुठलेही कॅम्पेन केले नाही. त्याचबरोबर त्यांनी यावेळी एक शब्दही उच्चारला नाही, केवळ मतदानानंतर शाई लावलेले बोट लोकांना दाखवले. यावरुन त्यांनी लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरीत केले असे म्हणता येईल, असे घटनातज्ज्ञ एस. कश्यप यांनी म्हटले आहे.