कंडोमची जाहिरात पाहण्यासारखी नसते ती अश्लील असते, उत्तेजना वाढवणारी असते असे मत राजस्थान हायकोर्टाने नोंदवले आहे. शरीर सुखाचे साधन म्हणून कंडोम विकण्यात येतात, गर्भधारणा होऊ नये म्हणून वापरण्यात येणारा पर्याय असा आशय असलेली कंडोमची जाहिरात नसते असेही कोर्टाने म्हटले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कंडोमची जाहिरात रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत दाखवावी असा आदेश काढला होता. या आदेशाला आव्हान देणारी याचिका ग्लोबल अलायन्स फॉर ह्युमन राइट्सने दाखल केली आहे. याच याचिकेबाबत राजस्थान कोर्टाने आपले म्हणणे स्पष्ट केले आहे.

न्या. गोपाल कृष्ण आणि न्या. जी आर मूलचंदानी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने कंडोमच्या जाहिरातींना घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेमुळे कंडोम व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. एड्सचा प्रचार रोखण्यासाठीही या वेळ मर्यादेमुळे अडथळे निर्माण होत आहेत असा दावा ग्लोबल अलायन्स फॉर ह्युमन राइट्स या संस्थेचे वकिल प्रतीक जैस्वाल यांनी केला. मात्र हा दावा राजस्थान कोर्टाने फेटाळून लावला आहे. स्क्रोल डॉट कॉमने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी लोकसंख्या ४५ कोटींच्या घरात होती आज ती १३० कोटीच्या वर गेली आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना यावर नियंत्रण कसे मिळवणार असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. कंडोमच्या जाहिरातींच्या वेळेवर जे निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा नेमका काय परिणाम होतो हे याचिका कर्त्यांच्या वकिलांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावण्यात आली असून कंडोमच्या जाहिराती या अश्लील असतात पाहण्याजोग्या नसतात असे राजस्थान हायकोर्टाने म्हटले आहे.