सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) मधील हिंसाचाराच्या मुद्यावर आज केंद्र सरकारच्या विरोधी पक्षांची काँग्रेसने महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीकडे  राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसनेबरोबरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यासह आम आदमी पार्टीने पाठ फिरवली आहे. यामुळे सरकारच्या विरोधकांमध्येच दुफळी निर्माण झाल्याचे दिसत आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीत सर्वच महत्वपूर्ण मुद्यांवर विस्तृत चर्चा होणार आहे. शिवाय, केंद्र सरकारविरोधाती आगामी काळातील रणनिती देखील ठरवली जाणार आहे. या बैठकीस एनसीपी, डीएमके, इंडियन यूनियन मुस्लीम लीग, डावी आघाडी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टीसह केंद्र सरकारविरोधातील जवळपास सर्वच पक्षांची उपस्थिती राहणार आहे. आज दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जसे की सर्वांना माहिती आहे की, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारला बसपाने बाहेरून पाठिंबा दिल्यानंतरही त्यांनी दुसऱ्यांदा त्या ठिकाणी बसपाचे आमदार फोडून त्यांना आपल्या पक्षात सहभागी करू घेतले, हे पुर्णपणे विश्वासघातकी आहे. अशावेळी काँग्रेसच्या नेतृत्वात आज विरोधकांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस बसपाने सहभागी होणं म्हणजे राजस्थानमधील पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण केल्या सारखे ठरेल, त्यामुळे बसपा या बैठकीत सहभागी होणार नाही. तशीपण बसपा सीएए आणि एनआरसी आदींच्या विरोधात आहे. केंद्र सरकारला पुन्हा आवाहन केले जात आहे की, त्यांनी हा विभाजन करणारा व असंविधानिक कायदा परत घ्यावा. याचबरोबर जेएनयू व अन्य शिक्षण संस्थांमध्ये देखील विद्यार्थ्यांचे राजकीयकरण करणे अतिदुर्देवी आहे, असं बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी स्पष्ट केले आहे.

बैठकीतील महत्वाचा मुद्दा जेएनयू, जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठमधील हिंसाचार राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी काँग्रेसकडून तथ्य शोधक समिती देखील तयार करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल काँग्रेसच्या हायकमांडकडे सोपवला आहे.

पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीकडे पाठ फिरवत काँग्रेसवर आरोप केला आहे की, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व डावी आघाडी चुकीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे आता आम्ही स्वतःच्या बळावरच सीएए आणि एनआरसीचा विरोध करणार आहोत.