शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी पोहोचलेल्या सीबीआयच्या टीमला पोलिसांनीच ताब्यात घेतले आणि सोडून दिले. गेल्या सहा तासांपासून हा हायव्होलटेज ड्रामा येथे सुरु आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप करीत धरणे आंदोलनाला बसल्या आहेत.

रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंडप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयने रविवारी थेट कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. मात्र, या छापेमारीसाठी आलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले आणि काही काळानंतर सोडून दिले. मात्र, यामुळे कोलकात्यात घटनात्मक पेच निर्माण झाला होता. दरम्यान, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हाकिम यांनी पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी भेट दिली दरम्यान त्यांच्यामध्ये बैठक पार पडली.

या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मोदी-शहा हे सुडाचे राजकारण करीत असून बंगालला त्रास देण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या इशाऱ्यावरुन ही कारवाई करण्यात येत असल्याचाही गंभीर आरोपही त्यांनी केला. वॉरंटविना पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्याची हिंमतच सीबीआयने कशी केली असा सवालही ममतांनी केला आहे.

शहा ब्रिगेडला आपण सभा घेण्यास परवानग्या नाकारल्यानेच ही कारवाई होत आहे. काल मोदींनी ज्या प्रकारे धमक्यांची भाषा वापरली आहे त्यावरुन तुम्हाला याची प्रचिती आलीच असेल. मी अजूनही ठामपणे सांगू शकते की कोलकाताचे पोलीस आयुक्त हे जगात एक नंबर आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण देणे ही माझी जबाबदारी आहे. वॉरंटविना सीबीआयची अशी कारवाई कशी काय करु शकते असा सवाल करताना आम्ही सीबीआयच्या अधिकाऱ्यांना अटक करु शकतो, मात्र आम्ही त्यांना सोडून दिले आहे, असे यावेळी ममता म्हणाल्या.

या प्रकाराचा तीव्र निषेध करताना संघराज्यात्मक रचनेला वाचवण्यासाठी आपण आजपासून धरणे आंदोलन सुरु करीत असून हे आंदोलन हा एक सत्याग्रच आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. कोलकात्यातील मेट्रो चॅनेल येथे त्या आंदोलनाला बसल्या असून त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त राजीव कुमारही उपस्थित आहेत.