दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप व आम आदमी पक्षाच्या रणधुमाळीत दिल्लीत सुपडा साफ होण्याच्या भीतीने काँग्रेसने अखेरच्या क्षणी संधिसाधू रणनीती आखली आहे. दिल्लीत अप्रत्यक्षपणे भाजपचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आल्यावर काँग्रेसने आपच्या केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला करण्याचे टाळले होते. दिल्लीत भाजप पराभूत झाल्यास आपोआप मोदींविरोधात वातावरण निर्माण होईल, असा काँग्रेस नेत्यांचा समज होता. परंतु दिल्लीत बदललेल्या समीकरणांमुळे ‘आप’ला अपशकुन करण्यासाठी कमळाला मदतीचा ‘हात’ देण्याची रणनीती काँग्रेसमध्ये स्थानिक स्तरावर आखली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सत्ता कुणाच्याही हाती आली तरी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही. याउलट मतविभागणीत ७० पैकी २८ मतदारसंघांत काँग्रेस पक्ष तिसऱ्या जागी फेकला जाईल, असा निष्कर्ष पक्षांतर्गत पाहणी अहवालात समोर आला आहे. त्यामुळे ‘आप’ला जाणारी मते प्रमुख विरोधी पक्षाच्या पारडय़ात टाकण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांनी (त्यात अगदी वॉर्ड स्तरावरच्या नेत्यांचादेखील समावेश आहे) दिल्या आहे. दिल्लीतील लढाई भाजप विरुद्ध आप अशी रंगल्याने काँग्रेस कुठेही नाही. दिल्लीत प्रचार करण्याऐवजी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी रस्त्यावर उतरले. राहुल गांधी यांच्यामुळे गत निवडणुकीत आपकडे वळलेला काँग्रेसचा पारंपरिक मतदार पुन्हा एकदा सोबत येण्याची शक्यता आहे. त्याचा थेट लाभ भाजपला मिळेल. या रणनीतीवर अद्याप काँग्रेसमध्ये एकमत झाले नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट  केले. ही रणनीती स्थानिक स्तरावर ठरते. स्थानिक समीकरणे भिन्न असतात. त्यामुळे ही रणनीती पक्षाची रणनीती मानता येणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
भाजपला पराभूत करा-बुखारी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मुस्लिमांना आपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जातीय शक्तींकडून समाजाला धोका असल्याचा दावा करत बुखारी यांनी आपला पाठिंबा दिला आहे. ‘आप’ला अशा पाठिंब्याची गरज नसल्याचे आपचे नेते संजय सिंह यांनी स्पष्ट  करत पाठिंबा धुडकावला आहे. जातीय राजकारणाच्या विरोधात आम्ही आहोत त्यामुळे या पाठिंब्याची गरज नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. देशाला जातीय शक्तींपासून धोका आहे. त्यामुळे फुटीरतावादी शक्तींपासून देशाला वाचवण्यासाठी आपला मतदान करण्याचे आवाहन बुखारींनी केले आहे. देशात धर्मनिरपेक्षता मजबूत राहणे हे मुस्लिमांच्या अस्त्विासाठी गरजेचे आहे. त्यामुळे दिल्लीत प्रामाणिक व धर्मनिरपेक्ष सरकार गरजेचे असल्याचे बुखारी यांनी सांगताना आपला पाठिंबा दिला आहे.
दिल्ली पोलिसांवर दबाव?
दिल्ली पोलीस भाजपच्या दबावाखाली काम करीत असून आम आदमी पार्टीच्या उमेदवारांविरोधात खोटय़ा तक्रारी नोंदवत आहेत, असा आरोप ‘आप’ने केला.निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी मोठय़ा प्रमाणावर दारूची पिंपे पकडली त्यासंदर्भात पोलिसांनी उत्तमनगर विधानसभा मतदारसंघातील ‘आप’च्या उमेदवाराला पाचारण केले. पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आहे, त्यामुळे त्यांच्याकडून सर्व आरोप केले जात आहेत, असे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
भाजपवर टीका
मोदी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपलाच मते देण्याचे आवाहन करणाऱ्या जाहिराती  प्रसिद्ध केल्याबद्दल आम आदमी पार्टीने (आप) शुक्रवारी भाजपवर टीका केली आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे आपने म्हटले आहे.
दिल्लीतील प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर भाजपची जाहिरात आहे आणि हा आचारसंहितेचा आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा सरळ भंग आहे, असे आपचे नेते आशुतोष यांनी म्हटले आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतर चित्रवाणी वाहिन्यांवरून जाहिराती प्रसारित करण्यास अनुमती नाही, असे असताना जाहिराती प्रसिद्ध करण्यास मुभा का, असा सवाल आशुतोष यांनी केला आहे.