*  जदयुनेही शक्यता फेटाळली
*  राष्ट्रवादीचे मात्र सकारात्मक संकेत
‘समविचारी’ पक्षांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकत्र येण्याबाबतच्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तिसऱ्या आघाडीची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. मात्र, तिसरी आघाडी ही कधीही अस्तित्वात न येणारे भारतीय राजकारणातील ‘चिरंतन मृगजळ’ आहे, अशा शब्दांत काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांनी त्याची खिल्ली उडवली. तर जदयुनेही तिसरी आघाडी शक्य नाही, असे सांगत याबाबतच्या चर्चेला सुरुंग लावला.
मुलायमसिंह यादव यांनी रविवारी सांगली येथील एका कार्यक्रमात समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची ही सर्वोत्तम वेळ असल्याचे म्हटले होते. समान ध्येय असलेल्या पक्षांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांत एकत्र आले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले होते.  मुलायम यांनी आपल्या पक्षातील नेते रामगोपाल यादव व नरेश अग्रवाल यांना तृणमूल काँग्रेस, जदयु, राजद, रालोद अशा प्रादेशिक पक्षांशी चर्चा करण्यास सांगितल्याचे समजते. त्यामुळे राजकीय वर्तुळात काँग्रेस किंवा भाजपचा समावेश नसलेल्या तिसऱ्या आघाडीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
मात्र, काँग्रेस व भाजपने या चर्चेला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले. केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते मनीष तिवारी हे म्हणाले की, ‘गेल्या २० वर्षांच्या राजकारणावर नजर टाकल्यास लक्षात येईल की तिसरी, चौथी किंवा पाचवी आघाडी हे भारतीय राजकारणातील चिरंतन मृगजळ आहे, हे लक्षात येते.’ भाजपचे नेते बलबीर पुंज यांनीही तिसरी आघाडी चुकीच्या कारणांसाठी चर्चेत राहील, मात्र ती अस्तित्वात येऊ शकणार नाही, असे मत मांडले. तिसऱ्या आघाडीतील संभाव्य पक्ष म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जदयुनेही भाजपच्या मताशी सहमती दर्शवली. ‘तिसऱ्या आघाडीची शक्यता सध्या दिसत नाही. मतदार यंदा स्पष्ट कौल देतील,’ असे जदयुने स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मुलायम यांच्या वक्तव्याला सहमती दर्शवली. ‘आघाडी सरकारांचे पर्व सुरू झाले आहे. समान ध्येय व धोरण असलेल्या वेगवेगळय़ा पक्षांनी एकत्र येऊन सरकार व आघाडी स्थापण्याची शक्यता आहे,’ असे राष्ट्रवादीचे सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी म्हणाले.
द्रमुककडून यूपीएचे कौतुक
श्रीलंकेतील तामिळांवरील अत्याचाराच्या मुद्यावरून केंद्र सरकारमधून बाहेर पडलेल्या द्रमुकने यूपीएच्या कारभाराचे मात्र कौतुक केले आहे. चेन्नईत द्रमुकच्या विशेष कार्यकारिणीच्या बैठकीत यूपीए सरकार चांगली विकासकामे करत असल्याची पावती देण्यात आली. यूपीएच्या कामांमुळेच तामिळनाडूतील अनेक प्रकल्प  मार्गी लागल्याचा ठरावच या बैठकीत मंजूर करण्यात आला.