केंद्रात सत्ताधारी भाजप आणि विरोधक काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये टीका-प्रतिटीकांचे राजकारण सुरू असून वातावरण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला संबोधून केलेल्या ‘हवालाबाजा’च्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खरा ‘हवाबाज’ आणि ‘दगाबाज’ कोण हे जनताच ठरवेल असे म्हटले आहे.

परदेशातील काळा पैसा भारतात आणून देशातील नागरिकांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन मोदींनी निवडणुकीआधी दिले होते. इतकेच नाही तर भाजपची सत्ता आल्यानंतर देशातील प्रत्येक शेतकऱयाला उत्पादन खर्चाच्या ५० टक्के नफा मिळेल असेही छातीठोकपणे सांगण्यात आले होते. मात्र, एकही आश्वासन अद्याप पूर्ण झालेले दिसत नाही. आजही शेतकऱयांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे खरा ‘दगाबाज’ कोण याचा न्याय जनताच करेल, असे रणदीप सुरजेवाला मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले.

दहाव्या विश्व हिंदी संमेलनाच्या उदघाटनावेळी बोलत असताना मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधत देशाच्या विकासात ‘हवालाबाजां’कडून अडथळे निर्माण होत असल्याचे वक्तव्य केले. तर याआधी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. निवडणुकीपूर्वी मोदींनी दिलेली आश्वासने म्हणजे केवळ हवाबाजी होती, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे सध्या दोन्ही बाजूंनी टीका-प्रतिटीका सुरू असून वातावरण चांगलेच तापले आहे.