08 March 2021

News Flash

महत्त्वाची बातमी; सचिन पायलट यांनी घेतली राहुल गांधी, प्रियंका गांधींची भेट

सत्ता संघर्षावर तोडगा निघण्याची शक्यता

राजस्थानात उद्भवलेल्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्ता संघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता आहे. पीटीआयनं काँग्रेस सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेला आरोप आणि त्यानंतर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसनंतर सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. महिनाभरापूर्वी राजस्थानात सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये गेहलोत-पायलट संघर्ष उफाळून आला होता. त्यामुळे सरकारसमोर अस्थिरतेचं संकटही उभं राहिलं होतं. महिनाभरापासून हा सत्ता संघर्ष सुरू असताना अचानक बंडखोर नेते सचिन पायलट यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे.

काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या हवाल्यानंतर पीटीआयनं वृत्त दिलं असून, सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतून सकारात्मक परिणाम दिसून येणं अपेक्षित असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या भेटीबरोबरच सचिन पायलट हे सध्या काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचीही संपर्कात आहेत. त्यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजस्थानाचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुरूवातीला केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आमदारांचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला. या आरोपानंतर गुजरात पोलिसांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस दिली होती.

पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर गेहलोत-पायलट वाद चिघळला. पायलट यांनी थेट बंडखोरी करत १८ आमदारांसह जयपूर सोडलं. तेव्हापासून सचिन पायलट यांनी या विषयावर विस्तृतपणे भूमिका मांडलेली नाही. ते भाजपात जाणार असल्याचं वृत्तही काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र, आपण भाजपात जाणार नसल्याचं पायलट यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 4:10 pm

Web Title: cong leader sachin pilot meets rahul gandhi priyanka gandhi vadra bmh 90
Next Stories
1 सरकारी अधिकाऱ्यांकडून मलाही आला कनिमोळींसारखा अनुभव – पी. चिदंबरम
2 रात्रीच्या अंधारात डोंगर रांगांमध्ये ‘राफेल’ची गर्जना, ‘मिशन लडाख’ची तयारी सुरु
3 सचिन पायलट यांनी काँग्रेस नेतृत्वाशी साधला संपर्क, भेटीसाठी मागितली वेळ
Just Now!
X