17 December 2017

News Flash

काँग्रेसचे नेते वातानुकूलित खोल्यात बसून राहतात

काँग्रेस पक्षाचे सूरजकुंड येथील अधिवेशन हे काटकसरीच्या देखाव्यामुळे गाजले असतानाच आता काँग्रेस पक्षाचे मध्य

भोपाळ, पीटीआय | Updated: November 13, 2012 3:48 AM

काँग्रेस पक्षाचे सूरजकुंड येथील अधिवेशन हे काटकसरीच्या देखाव्यामुळे गाजले असतानाच आता काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेशातील देवासचे खासदार सज्जन सिंग वर्मा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. संघाच्या कार्यकर्त्यांंची समर्पणवृत्ती मानावीच लागेल याउलट काँग्रेसचे नेते वातानुकूलित खोल्यात बसून राहतात असे वर्मा यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेत्यांपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते चांगले, कारण त्यांच्यात समर्पण वृत्ती असते असे ते म्हणाले. रा.स्व. संघाचे कार्यकर्ते चणेफुटाणे खाऊन राहतील तसेच त्यांची कामातील समर्पण वृत्ती फार मोठी आहे. आमचे (काँग्रेसचे) नेते वातानुकूलित खोल्यात बसतात, असे त्यांनी नीमच येथे काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर सांगितले. काँग्रेस पक्ष कठीण काळातून जात आहे असे सांगून ते म्हणाले की, आमचे वरिष्ठ नेते आपणच २०१३ मध्ये जिंकणार आहोत असे सांगून तोंडपाटीलकी करीत सुटले आहेत. जोपर्यंत आमचे वरिष्ठ नेते तळागाळातील लोकापर्यंत पोहोचणार नाहीत तोपर्यंत २०१३ ची निवडणूकजिंकणे अवघड आहे. दिल्लीतील आमच्या नेत्यांना कशाची काळजी नाही. ते त्यांच्या कामावर बेहद्द खुश आहेत, पण जेव्हा मध्य प्रदेशच्या जंगलातून प्रवास करायची वेळ येते तेव्हा आमचे नेते वातानुकूलित खोल्यातून बाहेर पडायला तयार नसतात. भाजपला मात्र रा.स्व.संघाचा भक्कम पाठिंबा आहे. रा.स्व.संघ वगळला तर भाजप नेतेही आमच्या काँग्रेससारखेच आहेत. २०१३ मध्ये नेमके काय करायचे आहे ते संघाच्या कार्यकर्त्यांंना माहीत आहे. त्यांना कसे जिंकायचे ते माहीत आहे.
वर्मा यांनी नंतर घूमजाव केले असून आपण काही बोललो नाही असे सांगितले. काँग्रेसपेक्षा रा.स्व.संघात जास्त शिस्त आहे असे आपण म्हणालो नाही. संघाच्या कार्यकर्त्यांना सोयीसुविधा नसतात पण ते तरीही काम करतात असे आपण म्हणालो. आमच्या कार्यकर्त्यांत जिद्द आहे पण वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ त्यांना मिळत नाही, त्यामुळे शेवटी ते कमकुवत ठरतात असे आपण म्हणालो असा खुलासा त्यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व नेते राहुल गांधी यांनी सूरजकुंड येथे इतर नेत्यांसमवेत बसची सफर केली व संवाद कार्यक्रमास गेले होते. त्यानंतर वर्मा यांनी हे विधान केले आहे. काँग्रेसचे विधानसभेतील नेते अजय सिंग यांनी सांगितले की, पक्षाचे कार्यकर्ते एकजुटीने काम करीत असून ते पुढील विधानसभा निवडणुकीत नक्कीच विजयश्री खेचून आणतील.

First Published on November 13, 2012 3:48 am

Web Title: cong mp sajjan singh verma praises rss for dedication embarrasses party