ललित मोदीप्रकरणात सुषमा स्वराज यांनी लोकसभेत सादर केलेल्या निवदेनात अनेक त्रुटी असल्याचे सांगत गुरूवारी काँग्रेसने हे निवेदन साफ नाकारले. हे निवदेन म्हणजे निव्वळ भावनिकरित्या बचाव करण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी काँग्रेसकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना याविषयी फार काळ मौन बाळगता येणार नाही, असे सांगत काँग्रेसने सरकारवर हल्ला चढवला. यानिमित्ताने मोदी आणि स्वराज यांनी पुन्हा एकदा संपूर्ण देशाची निल्लर्जपणे दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केला. तुम्ही आज संसदेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना भावनिक पद्धतीने निवदेन करताना बघितले असेल. मात्र, ती केवळ बचावादाखल करण्यात आलेली क्षमायाचना होती, असे आम्हाला वाटते. त्यामुळे इतरांच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्या या निवेदनाचा स्विकार करणे आमच्यासाठी अवघड असल्याचे आनंद शर्मा यांनी सांगितले. मुळात हा प्रस्ताव ब्रिटीश प्रशासनाने नाकारला असताना परराष्ट्रमंत्र्यांना गैरव्यवहाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला अशाप्रकारे लपूनछपून मदत करण्याची गरजच काय होती, असा सवालही शर्मा यांनी उपस्थित केला.
आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदी यांना सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचा आरोपावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी संसदेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी गुरुवारी निवेदन सादर करून आपली बाजू मांडली. ललित मोदी यांना पोर्तुगालमध्ये जाण्यासाठी प्रवासविषयक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी शिफारस मी ब्रिटन सरकारकडे केलेली नव्हती. केवळ ललित मोदी यांच्या पत्नीचा विचार करून ब्रिटन सरकारने त्यांच्या नियमानुसार ललित मोदी यांना प्रवासविषयक कागदपत्रे उपलब्ध करून दिली. तर त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होणार नाही, एवढाच संदेश पाठविला होता, असा खुलासा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेमध्ये केला होता. भारतीय नागरिक असलेल्या एखाद्या आजारी महिलेची मदत करणे, हा गुन्हा असेल, तर तो मी केला आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले होते.