सरकारवर राहुल यांचा ठपका; जेटलींकडून क्वात्रोकीची आठवण
मद्यसम्राट विजय मल्याने देश सोडल्याच्या मुद्दय़ावरून राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. सरकारने या प्रकरणी मल्यांना मदत होईल, अशी बोटचेपी भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा आरोप फेटाळून लावत, बोफोर्स प्रकरणात ओटाव्हीओ क्वात्रोकी काँग्रेस राजवटीतच देशाबाहेर गेले असा टोला लगावला.
मल्यामुद्दय़ावरून गुरुवारी दिवसभर संसद तसेच संसदेबाहेर आरोपांची राळ उडाली. राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या प्रकरणी मुद्दा उपस्थित करीत सरकारवर टीका केली. मल्या कोणी संत नाहीत. तसेच त्यांच्याशी सरकारचे काही देणे-घेणे नाही, असा युक्तिवाद लोकसभेत संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी केला.

जेटलींनी आरोप फेटाळले
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांचे आरोप फेटाळताना बोफोर्सचा मुद्दा उकरून काढला. १९९३ मध्ये बोफोर्स खटल्यात आरोपी असताना दिवंगत क्वात्रोकी देशाबाहेर गेले. मल्या व क्वात्रोकी या दोन्ही प्रकरणांतील फरक राहुल गांधी यांनी लक्षात घ्यावा, असा टोला जेटली यांनी लगावला. बोफोर्स प्रकरणात क्वात्रोकी लाभार्थी असल्याचे स्वित्र्झलडने कळवले होते. तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांचे पारपत्र ताब्यात घेण्यास बजावले होते. तरीही क्वात्रोकी यांना जाऊ दिले.
मल्या यांना रोखण्याबाबत कुठल्याही संस्थेला तसा आदेश नव्हता. बँकांनी मल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यापूर्र्वीच परदेशात गेल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांचे टीकास्त्र
बँकांकडे ९००० कोटींचे कर्ज थकीत असतानाही मल्यांना सरकारने देशाबाहेर कसे जाऊ दिले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काहीच उत्तर दिलेले नाही, असा आरोप राहुल यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना केला. देशाला याबाबत माहिती हवी, अशी मागणी राहुल यांनी केली. परदेशातील काळा पैसा मायदेशी आणणे प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये देणे ही आश्वासने तर सरकारने पाळलीच नसल्याचा आरोप राहुल यांनी केला. सरकारच्या कर सवलतीच्या योजनांचा फायदा काळाबाजारवाले तसेच अंमली पदार्थ तस्करांना झाल्याचा आरोपही केला. एखादी गरीब व्यक्ती चोरी करते तेव्हा तुम्ही त्याला तुरुंगात डांबता. मात्र एखादी व्यक्ती बँकांना ९ हजार कोटींना ठकवतो तेव्हा प्रथम श्रेणीने तुम्ही देशाबाहेर जाऊ कसे देता? हे काय घडत आहे, असा सवाल राहुल यांनी सरकारला केला.