News Flash

काँगोच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू वांशिक हल्ल्यातून नाही

काँगोचा विद्यार्थी मसोंडा केताडा ऑलिव्हर याच्या मृत्यूचा खटला वेगाने चालवण्यास सरकार वचनबद्ध आहे.

| June 1, 2016 03:05 am

आफ्रिकी नागरिकांवरील हल्ल्यांबाबत नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आदींनी आफ्रिकी देशांचे राजदूत व विद्यार्थी शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांना आश्वस्त केले.

सुषमा स्वराज यांचा निर्वाळा

आफ्रिकी व्यक्तींवर हल्ल्यांच्या घटना ताज्या असतानाच काँगोतील विद्यार्थ्यांचा दिल्लीतील ज्या हल्ल्यात मृत्यू झाला तो वांशिक हल्ल्याच्या गुन्ह्य़ाचा प्रकार नव्हता, असा निर्वाळा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिला आहे.

श्रीमती स्वराज, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग व परराष्ट्र सचिव एस. जयशंकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आफ्रिकी राजदूतांची व विद्यार्थ्यांची भेट घेतली. आफ्रिकी व परदेशी नागरिकांच्या संरक्षणासाठी सरकार एक संस्थात्मक यंत्रणा उभारत आहे असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. काँगोचा विद्यार्थी मसोंडा केताडा ऑलिव्हर याच्या मृत्यूचा खटला वेगाने चालवण्यास सरकार वचनबद्ध आहे. संबंधित गुन्हेगारांना कडक शिक्षा केली जाईल असे सांगून त्या म्हणाल्या की, ऑलिव्हर याचा मृत्यू क्रूर स्वरूपाचा आहे हे खरे असले तरी तो वांशिक स्वरूपाचा गुन्हा नाही. सीसीटीव्ही चित्रणात जे दिसते आहे त्यानुसार ऑलिव्हर याला स्थानिक लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांवरही हल्ला झाला. आमचे मंत्रालय देशाची प्रतिमा खराब करणाऱ्या घटनांबाबत समाजात जनजागृती करणार आहे, जास्त आफ्रिकी नागरिक असलेल्या राज्यांना त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. स्वराज यांना न्यूमोनियामुळे १५ मे रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात दाखल केले होते त्यानंतर प्रथमच त्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या. बैठकीत त्यांनी आफ्रिकी विद्यार्थ्यांनी जंतरमंतर येथे मंगळवारी (आज) आयोजित केलेले निषेध आंदोलन मागे घेतल्याबाबत त्यांचे आभार मानले. आफ्रिकी देशांचे राजदूत भारताने आयोजित केलेल्य आफ्रिका दिनाच्या कार्यक्रमात गेल्या आठवडय़ात सहभागी झाल्याबाबत त्यांचे स्वराज यांनी आभार मानले. त्या म्हणाल्या की, येत्या दहा-पंधरा दिवसात आम्ही विविध शहरात संपर्क साधून आफ्रिकी नागरिकांशी वर्तनाबाबत जागरूकता निर्माण करणारी यंत्रणा सुरू करू.

उपराष्ट्रपतींचे कारवाईचे आश्वासन

रब्बात, मोरोक्को-  आफ्रिकी नागरिकांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी निषेध केला असून, आफ्रिकी नागरिक हे आमचे पाहुणे आहेत. त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांत जर कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना अन्सारी यांनी मोरोक्कोची राजधानी असलेल्या रब्बात येथे सांगितले, की कुठलाही हल्ला मग तो स्वत:च्या देशातील किंवा परदेशातून आलेल्या पाहुण्या व्यक्तीवर केलेला असेल तरी तो निषेधार्ह आहे. कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचा कुठलेही सरकार निषेधच करीत असते. आफ्रिकी लोक हे आमचे पाहुणे आहेत. त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांत लक्ष घातले जाईल. आफ्रिकेशी भारताचे संबंध चांगले आहेत व आफ्रिकन देशांशी संबंधांना आम्ही महत्त्व देतो व आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. १९४७च्या आधीपासून आम्ही आफ्रिकेचे निर्वासहतीकरण करण्याची बाब मांडली होती. मागील यूपीए सरकार व आताचे एनडीए सरकार यांची आफ्रिकेबाबतची भूमिका सारखीच आहे. अन्सारी हे सध्या उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को व टय़ुनिशिया या दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. आफ्रिकी नागरिकांवर भारतात हल्ले होण्याच्या काही घटना घडल्या असून, त्यात काँगोचा एक विद्यार्थी दिल्लीत जमावाच्या मारहाणीत मारला गेला, तर हैदराबाद येथे एका नायजेरियन विद्यार्थ्यांला पार्किंगच्या जागेवरून मारहाण करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 3:05 am

Web Title: congo mans lynching not a case of racial discrimination says sushma swaraj
टॅग : Sushma Swaraj
Next Stories
1 स्मार्टफोन वापराची नवी नियमावली
2 महागाईत अधिभाराची भर!
3 श्रीलंकेकडून सात भारतीय मच्छीमारांना अटक
Just Now!
X