शोविक चक्रवर्तीच्या अटकेनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील व निवृत्त लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. “अभिनंदन भारत”, असं म्हणत त्यांनी या अटकेचा निषेध व्यक्त केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने शनिवारी शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चित्रपटसृष्टीशी निगडित व्यक्तींना शोविक अमली पदार्थ पुरवत होता, असा संशय अमली पदार्थविरोधी पथकाला आहे. शोविकनंतर रियावरही अटकेची टांगती तलवार आहे.

“अभिनंदन भारत, तुम्ही माझ्या मुलाला अटक केली आणि मला खात्री आहे की यानंतर माझ्या मुलीला अटक करणार आणि त्यानंतर आणखी कोण असेल ठाऊक नाही. तुम्ही अत्यंत प्रभावीपणे एका मध्यमवर्गीय कुटुंबाला उध्वस्त केलं आहे. पण अर्थातच न्यायासाठी सर्व काही न्याय्य आहे. जय हिंद”, असं वक्तव्य इंद्रजित चक्रवर्तींनी केलं.

आणखी वाचा : …तर मी कंगनाची माफी मागण्याचा विचार करेन- संजय राऊत

अमली पदार्थविरोधी पथकातील (एनसीबी) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शोविक अमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि वाहतुकीबाबत अनेक व्यक्तींच्या संपर्कात होता, हे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. चौकशीदरम्यान त्याने स्वत:हून काही व्यक्तींची नावे उघड केली, तर त्याचे व्हॉट्सअॅप चॅट, दूरध्वनी तपशील आणि आर्थिक व्यवहारांवरून अन्य व्यक्ती समोर आल्या आहेत. या प्रत्येक व्यक्तीकडे चौकशी करून शोविकसोबतचे व्यवहार, संबंध तपासले जाणार आहेत. सुशांतच्या मृत्यूशी अमली पदार्थांचा संबंध तपासण्यासाठी एनसीबी शोविक, रिया, सुशांतचा नोकर दीपेश सावंत आणि अन्य दोन आरोपींची समोरासमोर चौकशी करणार आहे.