मोठा राजकीय इतिहास लाभलेल्या काँग्रेस पक्षाने आज जणू निवडणुकीतील पराभवांना पक्षाचे ‘नशीब’ म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळेच देशातील जनताही काँग्रेसला प्रभावी पर्याय मानत नाही. बिहार आणि वेगवेगळ्या राज्यातील पोटनिवडणुकांच्या निकालावरून तरी असे वाटत आहे, अशी कठोर टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल्ल यांनी स्वपक्षावरच केली आहे. सिबल्ल यांच्या टीकेनंतर काँग्रेसच्या सद्यस्थितीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

बिहार आणि सात राज्यातील पोटनिवडणुकीतील निकालानंतर सिब्बल यांनी  इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले. एवढेच नव्हे तर त्यांनी पक्षातील दरबारी नेत्यांवर देखील टीका केली आहे. विशेष म्हणजे,  सिबल्ल यांच्यासह २२ नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधी यांना नेतृत्व बदलाविषयी पत्र लिहिले होते. यावेळी सिब्बल यांनी काँग्रेसच्या बिहार निवडणुकीतील अत्यंत वाईट कामगिरीवर पक्ष नेतृत्वाला लक्ष्य केले. ते म्हणाले, काँग्रेसने जणू प्रत्येक निवडणुकीत पराभव होणे हे पक्षाचे नशीब म्हणून स्वीकाले आहे. बिहार निवडणूक आणि इतर राज्यांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीबाबत पक्षाच्या वतीने अद्याप काहीच भूमिका मांडण्यात आलेली नाही. कदाचित पक्षाला सर्वकाही ठीक वाटत असावे आणि त्यांना हा पराभवही त्यांना इतर पराभवांसारखा सामान्य वाटत असावा. यातले पक्षाला नेमके काय वाटते, ते मला माहीत नाही. मी केवळ माझे मत मांडत आहे. मी पक्षातील वरिष्ठांनी या निकालाबाबत काहीही बोलल्याचे ऐकले नाही. माझ्यापर्यंत केवळ वरिष्ठांच्या आजूबाजूच्यांचा आवाज पोहोचतो. त्यामुळे मला तेवढेच माहिती असते, असा टोलाही सिब्बल यांनी लगावला.

सिब्बल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. सार्वजनिकरित्या वक्तव्य करून सिब्बल यांनी देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, अशी टीका गहलोत यांनी ट्विटद्वारे केली. ते म्हणाले, काँग्रेसने १९६९, १९७७, १९८९ आणि १९९६ यासारखी अनेक संकटे बघितली आहेत. परंतु त्यातून हा पक्ष अधिक मजबूत होऊन पुढे आला आहे. जनतेने काँग्रेस नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

आत्मपरीक्षणाची वेळ निघून गेली

बिहार विधानसभा निवडणूक आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकीतील निकालावरून असे वाटते की, जनता काँग्रेस पक्षाला प्रभावी पर्याय मानत नाही. बिहारमध्ये राजद पर्याय आहे. गुजरात पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.  येथे काँग्रेसच्या ३ उमेदवारांची अमानत जप्त झाली आहे. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना काही जागांवर २ टक्के पेक्षा कमी मते मिळाली आहेत. याबाबत पक्ष आत्मपरीक्षण करेल, असे माझे मित्र आणि काँग्रेस कार्यकारी समितीमधील एक सदस्य म्हणाले. पण, आत्मपरीक्षणाची वेळ निघून गेली आहे. गेल्या सहा वर्षांत आत्मपरीक्षण केले नाही. आता  तशी अपेक्षा बागळून  उपयोग नाही. काँग्रेसचे नेमके काय चुकतेय, या महत्त्वाच्या विषावरील उत्तर शोधण्याची पक्षाची इच्छा नाही. कारण, काँग्रेस कार्यकारी समिती नामनिर्देशित सदस्यांचाच भरणा आहे. प्रत्येक संघटनेत संवाद आवश्यक आहे, असेही सिब्बल म्हणाले.