काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांच्या नाराजीनाटय़ानंतर, हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी तीन नव्या समित्या बनवल्या असून चार ‘बंडखोर’ नेत्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक, परराष्ट्र संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर पक्षाध्यक्षांना सल्ला देण्यासाठी या समित्या असतील.

तीनही नव्या समित्यांमध्ये सोनियांचे अत्यंत विश्वासू व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. आर्थिक समितीचे समन्वयपद जयराम रमेश यांच्याकडे देण्यात आले आहे. परराष्ट्र संबंधांवरील समितीचे माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद हे समन्वयक आहेत. विनाकष्ट सत्तेसाठी आतुर होणारे नेते असल्याची टीका खुर्शिद यांनी सिबल यांच्यावर केली आहे. राष्ट्रीय सुरक्षाविषयक समितीचे समन्वयक व्हिन्सेंट पाला असतील. त्यामुळे या समित्याही गांधी निष्ठावानाच्या अखत्यारित असतील.

गेल्या ऑगस्टमध्ये २३ बंडखोर नेत्यांनी सोनिया गांधी यांना नेतृत्व व पक्ष संघटनेच्या मुद्दय़ांवर नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले होते. त्यावर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, कपिल सिबल, आनंद शर्मा यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. आझाद व शर्मा यांचा अनुक्रमे राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र संबंधांवरील समित्यांमध्ये समावेश केला गेला आहे.

पी. चिदम्बरम हे बंडखोर नेत्यांच्या यादीत नव्हते. मात्र, बिहार निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांना आर्थिक समितीत स्थान दिले आहे. शशी थरूर यांनी पक्षांतर्गत निवडणुकांचा आग्रह धरला होता.

वीरप्पा मोईलींनी पक्षसंघटना मजबुतीचा मुद्दा उपस्थित केला होता. या दोघांनाही परराष्ट्र व राष्ट्रीय सुरक्षाच्या समितीत सामावून घेतले गेले आहे.

कपिल सिबल यांना स्थान नाही..

कपिल सिबल यांना मात्र कुठल्याही समितीत पक्षाध्यक्षांना सल्ला देण्यासाठी घेतलेले नाही. पक्षाची आत्मपरीक्षण करण्याची वेळ संपली असल्याचे विधान करून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यावर गांधी निष्ठावान अशोक गेहलोत, अधीर रंजन चौधरी यांनी सिबल यांच्याविरोधात शाब्दिक हल्लाबोल केला होता.