05 August 2020

News Flash

विरोधी भूमिकेबद्दल शहा यांची काँग्रेसवर टीका

भाजप जे काही करते, त्याला काँग्रेसला विरोध करायचा असतो असे त्यांनी सांगितले.

| October 10, 2019 03:12 am

कैथल (हरयाणा) : अनुच्छेद ३७० बाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बुधवारी काँग्रेसवर हल्ला चढवला, तसेच पहिले राफेल लढाऊ विमान भारताच्या ताब्यात आले त्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या ‘शस्त्रपूजेवर’ टीका केल्याबद्दलही त्यांनी त्या पक्षाला धारेवर धरले.

अनुच्छेद ३७० रद्द करण्यास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोध केला होता. तुम्ही अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या बाजूने आहात की विरोधात हे स्पष्ट करावे, असे आवाहन मी राहुल यांना करतो, असे भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शहा हरयाणातील कैथल येथील एका निवडणूक प्रचारसभेत म्हणाले. भाजप जे काही करते, त्याला काँग्रेसला विरोध करायचा असतो असे त्यांनी सांगितले.

२१ ऑक्टोबरला मतदान होणार असलेल्या हरयाणात शहा हे बुधवारी तीन प्रचारसभांना संबोधित करणार होते.

अनुच्छेद ३७० व ३५ अ यांचा अडथळा असल्याने जम्मू-काश्मीरचे भारतीय संघराज्याशी संपूर्ण एक्य होत नव्हते, अशी देशातील लोकांची भावना होती. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. हा देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्दा होता, मात्र काँग्रेसने त्याच्या विरोधात मतदान केले, असे शहा म्हणाले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये केलेल्या शस्त्रपूजनाबद्दल काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात शहा म्हणाले, की काँग्रेसच्या लोकांना याचेही वाईट वाटले.

काल चांगल्याचा वाईटावर झालेला विजय दर्शवणारी विजयादशमी होती. त्यानिमित्त राफेलबाबत मी पंतप्रधान व संरक्षणमंत्री यांचे अभिनंदन करतो, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 3:12 am

Web Title: congress against indian traditions says amit shah zws 70
Next Stories
1 फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा फलदायी ; राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
2 चीनचे अध्यक्ष जिनपिंग-मोदी यांच्यात ११ ऑक्टोबरपासून चर्चा
3 केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट!
Just Now!
X