लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचे कार्ड खेळण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यभरात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येविरोधात केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर जिल्हा ते राज्य पातळीवर परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. मे व जूनमध्ये राज्यभरात विशेषत: ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण होते. जनतेत असलेल्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी या परिषदा आयोजित केल्या जातील. त्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलावण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे त्रस्त झालेले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्रात सुमारे बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना लोकसभेत केंद्रीयमंत्री राधामोहन सिंह केवळ तीनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वक्तव्य करतात. हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
 शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही परिषदा घेणार आहोत. आमच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते, परंतु या सरकारने त्यावर साधा विचारही केलेला दिसत नाही, असा आरोप चव्हाण यांनी
केला.
नवी मुंबईत राष्ट्रवादीशी युतीचे संकेत
विधानसभा निवडणुकीनंतर बिनसलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गणित नवी मुंबई पालिका निवडणुकीत पुन्हा जुळण्याची चिन्हे आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी पुन्हा एकदा आघाडी होणार असल्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक व अशोक चव्हाण यांच्यात शनिवारी होणाऱ्या बैठकीनंतर पालिकेत आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.