उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष बहुजन समाज पक्षासमवेत युती करण्याची चाचपणी काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बसपसमवेत आघाडी करण्यास अनुकूल आहेत. अर्थात या वृत्तास पक्षातून अधिकृत दुजोरा मिळाला नाही. परंतु राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांच्या मते समाजवादी पक्ष व भारतीय जनता पक्ष या दोन्ही प्रमुख विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसकडून बसपला हातमिळवणीसाठी विचारणा होऊ शकते. उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.
मायावती यांनी आतापासूनच रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. मायावती बसपचे जिल्हानिहाय मेळावे घेत आहेत. मे २०१६ पर्यंत उमेदवारनिश्चितीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या दशकभरात उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची संघटनात्मक अवस्था अत्यंत बिकट आहे. अद्याप पक्षाला राज्यात प्रदेश अध्यक्षपदी नवा चेहरा नेमता आला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी बसपला आघाडी करण्याची योजना आखली आहे. यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकतात, असा दावा सूत्रांनी केला. राज्यसभेत मायावती यांनी गेल्या वीस महिन्यांमध्ये सावध भूमिका घेतली असली तरी त्यांनी एकदाही केंद्र सरकारला उघड विरोध केलेला नाही. त्यामुळे मायावती यांच्याशी आघाडी करण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. राज्यसभा खासदार व एससी आयोगाचे अध्यक्ष पी.एल.पुनिया यांनीदेखील मायावती यांच्याशी आघाडी न करण्याची विनंती राहुल गांधी यांना केली आहे.