काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या ‘काठी’च्या शेरेबाजीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात समाचार घेतला असला तरी, भाजप मात्र हा मुद्दा सोडायला तयार नसल्याचे शुक्रवारी सभागृहात दिसले. या मुद्दय़ांचे तीव्र पडसाद शुक्रवारी लोकसभेत उमटले. काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की होऊन सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

मोदींनीही आसाममधील कोक्राझार येथील जाहीर सभेत पुन्हा काठीच्या विधानावरून राहुल गांधी यांना लक्ष्य केले. ‘‘मला काठीने मारण्याची भाषा काही लोक करतात; पण इतक्या मोठय़ा संख्येने माताभगिनी मला आशीर्वाद द्यायला इथे आलेल्या आहेत. त्यांचे आशीर्वाद माझे रक्षण करेल. कोणाची काठी मला इजा पोहोचवू शकणार नाही,’’ असे सांगत मोदींनी नाव न घेता राहुल यांच्यावर टीका केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी मोदींवर बेरोजगारीच्या प्रश्नावरून टीका केली होती. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून तरुणांमध्ये असंतोष आहे. पंतप्रधान रोजगार देऊ  शकतात की नाही याची सहा महिने हे तरुण वाट बघतील. त्यांना रोजगार मिळाले नाहीत तर ते मोदींना काठीने चोप देतील, असे विधान राहुल यांनी केले होते. त्याचा संदर्भ पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील उत्तराच्या भाषणात दिला. सहा महिन्यांनी काठीचा मार मिळणार असेल तर तो सहन करण्यासाठी शारीरिकदृष्टय़ा सक्षम राहिले पाहिजे. त्यासाठी मी अधिक सूर्यनमस्कार घालेन, असे मोदी म्हणाले.

‘काठीचा चोप’ हे विधान करून राहुल गांधी यांनी देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे होते. लोकसभेत शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासाला राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन उभे राहिले; पण थेट प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी राहुल यांच्या विधानावर टिप्पणी करण्यास सुरुवात केली.

राहुल यांचे वडीलही पंतप्रधान होते. भाजपच्या कोणी नेत्याने इतक्या खालच्या स्तरावर जाऊन त्यांना काठीने मारण्याची भाषा केल्याचे आठवत नाही. राहुल यांच्या विधानाचा सभागृहाने निषेध केला पाहिजे, अशी मागणी हर्षवर्धन यांनी केली.

हर्षवर्धन यांचे वक्तव्य ऐकताच संतापलेल्या काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या समोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली. खासदार मणिकम टागोर हे तर हर्षवर्धन यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. टागोर यांचा आक्रमक पवित्रा पाहून भाजपचे खासदार हर्षवर्धन यांच्या मदतीला धावले. त्यांनी टागोर यांना गराडा घालून अडवले. दोनही बाजूंकडील गोंधळ वाढत गेल्याने सभागृह तहकूब करण्यात आले.

महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न – राहुल

संसदेच्या आवारात राहुल गांधी म्हणाले की, मी सभागृहात बोललेले भाजपच्या नेत्यांना आवडत नाही. मी सभागृहाच्या बाहेर बोललो तो मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची गरज नव्हती तरीही गैरसंसदीय पद्धतीने तो मांडण्यात आला. बेरोजगारीसारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षाला बोलू न देण्याचे डावपेच सत्ताधाऱ्यांनी आखलेले आहेत.