भाजपा सरकारने देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम निव्वळ कागदी इमले बांधायची संस्कृती संपुष्टात आणली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ते मंगळवारी राजस्थानच्या बारमेर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारने जनतेला केवळ खोटी आश्वासने दिल्याचा आरोप केला. केवळ लोकप्रियतेसाठी काही लोकांनी जनतेला खोटी आश्वासने दिली. त्यामुळे आमच्या हातात सत्ता आल्यावर सर्वप्रथम आम्ही यापैकी किती काम प्रत्यक्षात झाले आहे, याचा आढावा घेतला. त्यानंतर आम्ही लोकांची दिशाभूल करण्याची संस्कृती संपुष्टात आणली, असे मोदींनी सांगितले.

काँग्रेसच्या कार्यकाळात तब्बल १५०० योजनांची घोषणा करण्यात आली. मात्र, या योजना निव्वळ कागदावरच राहिल्या. काँग्रेस पक्षाकडून दरवर्षी लोकप्रियतेसाठी रेल्वे अर्थसंकल्पात लोकांची दिशाभूल केली जात असे. सैनिकांसाठीच्या ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेचीही तीच गत झाली. काँग्रेसने या योजनेसाठी बजेटमध्ये केवळ ५०० कोटी रूपयांची तरतूद केली. मात्र, आम्ही सत्तेत आले तेव्हा आमच्या लक्षात आले की, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तब्बल १२ हजार कोटींची गरज आहे. काँग्रेसने केवळ ‘गरिबी हटाव’सारख्या आकर्षक घोषणा देण्यात धन्यता मानली. त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले मात्र बँकांचे दरवाजे गरिबांसाठी कधीच खुले झाले नाहीत. जनधन योजनेमुळे ही परिस्थिती बदलली आणि खऱ्या अर्थाने बँकेच्या सुविधा गरिबांपर्यंत पोहोचल्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

यावेळी मोदींनी राजस्थानातील दुष्काळी परिस्थितीवरूनही काँग्रेसला धारेवर धरले. काँग्रेस आणि दुष्काळाचे जुळ्या भावांप्रमाणे सख्य आहे. जिथे काँग्रेस जाईल, तिथे दुष्काळ जातो, असा उपरोधिक टोला त्यांनी हाणला. मात्र, वसुंधरा राजे यांनी त्यांच्या लागोपाठच्या कार्यकाळात दुष्काळाची परिस्थिती ज्याप्रकारे हाताळली, ते स्तुत्य होते. ही परिस्थिती विरोधकांच्या कार्यकाळाच्या अगदी उलटी आहे. त्यावेळी राजस्थान देशभरात गंभीर दुष्काळी परिस्थितीसाठी ओळखले जाई, असे सांगत मोदींनी काँग्रेसवर टीका केली.