पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांपैकी १९३ जागांबाबत काँग्रेस आणि डाव्या आघाडीत समझोता झाल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिर रंजन चौधरी यांनी गुरुवारी येथे सांगितले. उर्वरित १०१ जागांबाबतचा निर्णय कालांतराने घेण्यात येणार असल्याचेही चौधरी यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

शहरातील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमन बोस आणि दोन्ही पक्षांचे अन्य ज्येष्ठ नेते हजर होते.

समझोता झालेल्या १९३ जागांपैकी १०१ जागा डावे पक्ष लढणार आहेत तर काँग्रेस ९२ जागा लढणार आहे. या १९३ जागांमध्ये त्यांनी २०१६ मध्ये जिंकलेल्या ७७ जागांचा समावेश आहे. त्या वेळी काँग्रेसने ४४ जागा तर डाव्या पक्षांनी ३३ जागा जिंकल्या होत्या.

मंत्र्याच्या घरानजीक बॉम्बफेक

मोटारसायकलवरून आलेल्या काही समाजकंटकांनी पश्चिम बंगालमधील एका मंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ गावठी बॉम्ब फेकले. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. माहिती व संस्कृती खात्याचे राज्यमंत्री इंद्रनील सेन यांच्या कसबा भागातील घराजवळ बुधवारी रात्री करण्यात आलेल्या या बॉम्बफेकीत कुणीही जखमी झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले. गायक असलेले व नंतर राजकारणात आलेले सेन हे ही घटना घडली तेव्हा घरी नव्हते. या घटनेतील सहभागाबद्दल सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याजवळून ३ दुचाकी वाहने तसेच देशी बॉम्बचा साठा जप्त करण्यात आला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.