पठाणकोट येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला म्हणजे मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याची भेट असल्याची बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ज्याची भीती होती तेच घडलयं, एका बाजुला आमचं सरकार पाकिस्तानशी शांततेच्या गोष्टी करतयं आणि दुसरीकडे पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले करण्यात येत आहेत. पठाणकोट हल्ला म्हणजे नरेंद्र मोदींना पाकिस्तान दौऱ्याची दहशतवाद्यांकडून देण्यात आलेली भेट असल्याचे राऊत यांनी सांगितले.
नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा वाढदिवस आणि त्यांच्या नातीचा विवाह, हे निमित्त साधत मोदी यांनी पाकिस्तानला ही अवचित भेट दिली होती. भारत-पाकिस्तान या दोन्हीही देशांमध्ये सुरू असलेल्या शांतता वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण राजकीय खेळी ठरली होती. मात्र, आता पठाणकोट हल्ल्यानंतर विरोधकांनी मोदींच्या पाकिस्तान भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही नियोजित कार्यक्रमाशिवाय नवाज शरीफांना भेटले, पण पाकिस्तान स्वत:चा पवित्रा बदलायला तयार नाही. तेव्हा मोदींनी घाईघाईने पाकिस्तान दौरा करून काय साध्य केले, असा सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे.