News Flash

काँग्रेसचा माफीनामा; मोदींबाबत केले होते अपमानास्पद ट्विट

युवा देशच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेताच पोस्ट केल्याचा दावा

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपमानास्पद ‘मीम’ ट्विट केल्याबद्दल भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंह राजा यांनी माफी मागितली आहे. मंगळवारी संध्याकाळी युवा काँग्रेसचे ऑनलाईन नियतकालिक युवा देशच्या ट्विटर हँडलवर मोदींच्या चहा विकण्यावरुन अपमानास्पद मीम पोस्ट करण्यात आले होते. यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले होते. त्यानंतर आज काँग्रेसकडून याबाबत माफी मागण्यात आल्याने या वादावर पडदा पडला आहे.

‘काँग्रेस अशा प्रकारांना कधीही परवानगी देणार नाही, मीमच्या माध्यमांतून करण्यात आलेल्या विनोदाला पक्ष विरोध करतो. काँग्रेसची धोरणे आणि मतं यामध्ये फरक असून काँग्रेसची संस्कृती पंतप्रधानपदाचा तसेच सर्व राजकीय विरोधकांचा आदर करणारी आहे.’ असे ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केले आहे.

या वादग्रस्त मीमनंतर भाजप नेत्यांनी मंगळवारी ट्विटरवर संताप व्यक्त केला होता. ‘भारतातील गरीब व्यक्तींवर टीका करीत युवा काँग्रेसने त्यांच्या मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. काँग्रेसचे युवराज अर्थात राहुल गांधी या प्रकाराचे समर्थन करतात का?’ असा सवाल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानींनी केला होता.

राजा यांनी ट्विटमध्ये म्हटले की, युवा देशच्या कार्यकर्त्यांकडून ही पोस्ट टाकण्यात आली होती. त्यासाठी काँग्रेस नेत्यांची परवानगी घेण्यात आली नव्हती. आम्ही सर्व विरोधकांचा आणि पंतप्रधानांचा देखील आदर करतो असे त्यांनी म्हटले आहे.

युवा काँग्रेसचे पदाधिकारी सुरज हेगडे प्रतिक्रिया देताना म्हणाले, काँग्रेस समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींचा आदर करते, सर्वांना एकसमान मानते. तर, काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील या पोस्टवर टीका केली असून ही काँग्रेसची विचारधारा नसल्याचे म्हटले आहे. युवा देशचे अकाऊंट कार्यकर्त्यांमार्फत चालवले जाते. युथ काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलशी ते जोडलेले नाही, असे काँग्रेसच्या संपर्क विभागाचे सदस्य रचित सेठ यांनी स्पष्ट केले.

गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेस आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. मोदींच्या गृह राज्यात ९ डिसेंबर आणि १४ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. गेल्या काही महिन्यांत काँग्रेसचा सोशल मीडियात प्रभाव वाढला असून सत्ताधारी भाजप सरकार राहुल गांधी यांच्या निशाण्यावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 2:39 pm

Web Title: congress apologises for twitter meme on modi posted by youth magazine
Next Stories
1 पुतण्या-पुतणीची काकानेच केली हत्या, पित्याने दिलेली सुपारी
2 निर्माते-दिग्दर्शक अशोक कुमार यांची आत्महत्या
3 योगींच्या सभेत सर्वांसमोर ‘तिला’ बुरखा काढण्यास भाग पाडले
Just Now!
X