देशात वाढत्या करोना संकटाबरोबरच बेरोजगारीतही भर पडत आहे. रोजगाराच्या घटत्या संधीवरून विरोधी पक्षांनी आवाज उठवला असून, काँग्रेससह समाजवादी पक्षानं (९ सप्टेंबर) आज रात्री ९ वाजता ९ मिनिटं दिवे बंद करण्याचं आवाहन केलं आहे.

करोना आणि लॉकडाउनमुळे देशात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. लॉकडाउनचा मोठा फटका अर्थव्यस्थेला बसल्यानं जीडीपी घसरला आहे. त्याचा थेट परिणाम रोजगार निर्मितीवर झाला असून, बेरोजगारी वाढत असल्याचं अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या काही अहवालातून दिसून आलं आहे.

देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विट करून नागरिकांना दिवे बंद करण्याचं आवाहन केलं आहे. “देशातील तरुण आपलं म्हणणं मांडू इच्छित आहे. थांबलेली भरती, परीक्षांच्या तारखा, नियुक्त्या आणि नवीन नोकऱ्यासंदर्भात तरुण आपलं म्हणणं मांडत आहे. आज आपल्या सगळ्यांना या तरुणांच्या रोजगारीच्या लढाईला पाठिंबा देण्याची गरज आहे. त्यामुळे ९ वाजता ९ मिनिटं दिवे बंद करावेत,” असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं.

प्रियंका गांधींबरोबरच समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. ज्यामुळे तरुणांच्या मुठी वळतात, तेव्हा सत्ताधीशांची झोप उडते. तरुणांच्या बेरोजगारीच्या अंधारात आज आपण ९ वाजता ९ मिनिटं दिवे बंद ठेवून क्रांतीची मशाल पेटवावीत,” असं आवाहन अखिलेश यादव यांनी केलं आहे.