काँग्रेसने आज (शुक्रवार) पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले असून महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी मोहनप्रकाश यांची उचलबांगडी करत लोकसभेतील पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती केली आहे. खर्गे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा महत्वपूर्ण बदल केला आहे. या बदलाबरोबरच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी जे डी सिलम आणि महेंद्र जोशी यांना पक्षाचे सरचिटणीस आणि शशिकांत शर्मा यांना सहसरचिटणीस म्हणून नियुक्त केले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे सीमावर्ती भागातील असून त्यांना महाराष्ट्राची चांगली जाण आहे. तसेच त्यांचे मराठीही चांगले आहे. त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. कारण येत्या काळात महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्वाकडून हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मोहन प्रकाश हे मागील ७ ते ८ वर्षांपासून महाराष्ट्राचे काम पाहत होते. सुरूवातीला ए के अँटोनी हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी असताना त्यांनी सहप्रभारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्यांच्या कार्यकाळात पक्षाला पाहिजे तसा बदल दिसून आला नसल्याचे बोलले जाते. खर्गे यांच्या नियुक्तीचा पक्षाला राज्यात फायदा होईल असे बोलले जाते.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, ओदिशा आणि मिझोराम या राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यासाठी निवड समितीही पक्षाने नियुक्त केली आहे.