विविध रंगांची, आकारांची फुललेली कमळे तळ्यात तरंगताना पाहणे हे नयनरम्य दृश्य असले तरी सध्या हेच दृश्य मध्य प्रदेशमधील काँग्रेसजनांच्या डोळ्यात खुपू लागले आहे. त्याचे कारणही अगदी स्पष्ट आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, तेथील सत्तारूढ भाजपची निवडणूक निशाणी कमळ आहे. अनेक तळ्यांमध्ये तरंगणारी कमळे हा भाजपचा प्रचारच करतात, असा साक्षात्कार प्रमुख विरोधी पक्ष असेलल्या काँग्रेसला झाल्याने त्यांनी ज्या तळ्यात कमळे फुललेली आहेत, अशी तळीच झाकून टाकण्याची अजब मागणी केली आहे.
मध्य प्रदेशात निवडणूकपूर्व चाचणी करण्यात आली, त्यामध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेच पुन्हा एकदा बाजी मारणार असल्याचे सिद्ध झाले आहे आणि मध्य प्रदेश काँग्रेसजनांच्या डोळ्यात कमळ सलणे हेच त्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळेच मतदारांच्या डोळ्यांना सुखावणारी कमळाची तळी झाकून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे तशा प्रकारचे आदेश देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
महाकौशल, माळवा आणि बुंदेलखंड यथील तळ्यांमध्ये ही सुंदर कमळे तरंगताना दिसत आहेत. मात्र ही तळीच झाकून टाकण्याची मागणी करून काँग्रेसने आपली मानसिक दिवाळखोरीच दर्शविली असल्याचे भाजपचे प्रवक्ते विश्वास सारंग यांनी म्हटले आहे. काँग्रेसची निवडणूक निशाणी ‘हात’ असल्याने आता यापुढे लोकांनी म्हणजेच मतदारांनी हात झाकून फिरण्याची मागणी करण्यासारखाच हा प्रकार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत महाकौशल, माळवा आणि बुंदेलखंड येथील निसर्गरम्य तळ्यांमध्ये कमळे मोठय़ा प्रमाणावर फुलतात. पाटण्यातील हुंकार मेळाव्यात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीही कमळाचाच संदर्भ घेतला. देशाला बदल हवा आहे, त्यामुळे भाजप आणि आपल्यावर जेवढी चिखलफेक होईल, तेवढेच कमळ अधिक तेजाने चमकेल, असे मोदी यांनी म्हटले आहे.

भाजपला छठ पूजेचे वेध!
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षासाठी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिवाळीपेक्षाही छठ पूजा महत्त्वाची ठरणार आहे. दिवाळीनंतर लगेचच ९ ऑक्टोबरला येणाऱ्या छठ पूजेसाठी राज्यातील झाडून सारे भाजप नेते कामाला लागले आहेत. दिल्ली विधानसभेतील सत्तरपैकी २२ मतदारसंघांत बिहार व उत्तर प्रदेशातील स्थलांतरित नागरिकांची एकूण संख्या ३४ टक्के आहे. त्यांच्या एकगठ्ठा मतांसाठी प्रदेश भाजपने विविध ठिकाणी छठ पूजेचे आयोजन केले आहे.
पूर्व दिल्लीत १३, पश्चिम दिल्लीत ५ तर उत्तर व दक्षिण दिल्लीत एकूण ४ मतदारसंघांत बहुसंख्य बिहारी व उत्तर भारतीय मतदार आहेत. सर्वाधिक ७ टक्के मतदार त्रलोक्यपुरी मतदारसंघात आहेत. कुठल्याही एका पक्षाचा पाठीराखा नसलेल्या या वर्गाला भाजप छठ पूजेच्या माध्यमातून आवाहन करणार आहे. पूजेसाठी मतदारांना तलाव असलेल्या उद्यानात नेण्याची व्यवस्था करण्यापासून ते त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत.