24 September 2020

News Flash

मोदी १९ जूनला खोटं का बोलले?, मोदी कोणत्या दबावाखाली चीनला क्लीन चीट देत आहेत?; काँग्रेसकडून प्रश्नांचा मारा

सोशल मीडियावरही #BikGayiModiSarkar हॅशटॅग चर्चेत

प्रातिनिधिक फोटो

संसदेच्या मान्सून सत्राच्या तिसऱ्या दिवशाच्या कामकाजानंतर काँग्रेसने सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदी सरकारवर अनेक मुद्द्यावरुन टीका केली आहे. अगदी चीनबरोबरच्या सीमा वादापासून ते देशातील अर्थव्यवस्थेसंदर्भातील अनेक मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपाला सुनावले आहे. भारत आणि चीनमधील संघर्षानंतरही केंद्र सरकारने चिनी बँकेकडून कर्ज घेण्यास परवानगी कशी दिली?, मोदी चीनला क्लीन चीट का देत आहेत?, चीनबरोबरची चर्चा यशस्वी होणार नाही या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय?, असे अनेक प्रश्न काँग्रेसने भाजपाला विचारले आहेत. सोशल मीडियावरही #BikGayiModiSarkar हॅशटॅग वापरुन काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

पंतप्रधान चीनला एवढं का घाबरतात असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. “पंतप्रधान चीनच थेट उल्लेख करण्यास का घाबरतात. पंतप्रधानांनी प्रत्येक मुद्द्याबद्दल देशातील नागरिकांना खोटी माहिती दिली आहे. मात्र भारत-चीन सीमा प्रश्नासंदर्भात पंतप्रधानांनी केलेले दावे सहन करण्यापलीकडचे आहेत,” असं काँग्रेसने ट्विटवरुन म्हटलं आहे.

“भाजपा देशातील नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवू पाहत आहे. संसदेमध्ये भारतीय सैनिकांसंदर्भातील प्रस्ताव मंजूर कऱण्यासंदर्भात भाजपा नाटक करत आहे. मात्र खासदारांना भारतीय लष्कराबद्दल समर्थन व्यक्त करण्याची परवानगी दिली जात नाही. भाजपाकडून हा दुटप्पीपणा का केला जातोय?,” असा प्रश्न अन्य एका ट्विटमध्ये विचारण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेले दावे चुकीचे असल्याचे संरक्षण मंत्र्यांच्या भाषणातून स्पष्ट झाल्यानंतर गृहमंत्री त्यांच्या मदतीला आले. हे अगदी लज्जास्पद आहे. भाजपाने एकदाचं काय ते ठरवून घ्यावं आणि मोदीजींऐवजी भारताला प्राधान्य द्यावं, असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे.

भारत आणि चीनमध्ये जून महिन्यात झालेल्या हिंसक झटापटीमध्ये २० जवान शहीद झाल्यानंतरही पंतप्रधानांनी चीनला क्लीन चीट दिल्याचा आरोपही काँग्रेसन ेकेला आहे. “पंतप्रधान हे चीनच्या हातातील बोलका पोपट का झाले आहेत? त्यांना ५६ इंचांच्या छातीवर ९२०२ कोटींचे कर्ज अधिक जड झालं का?”, असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.

याचबरोबर पवन खेरा यांनी मांडलेले काही मुद्देही ट्विटवरुन शेअर करण्यात आले आहेत. “काल सरकराने संसदेमध्ये चीनमधील बँकेतून ८ मे रोजी ५० मिलियन डॉलरचा पहिला हफ्ता आणि १९ जूनला ७५० मिलियन डॉलरचा दुसरा हफ्ता घेतल्याचे कबुल केलं. या १९ जूनला मी काळा दिवस म्हणणे. कारण याच दिवशी मोदी देशाबरोबर पहिल्यांदा खोटं बोलले. १९ जूनला क्लीन चीट देण्याबरोबरच तेथील बँकेकडून निधीही घेतला,” असं पवन यांनी म्हटलं आहे.

“परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनबरोबर पूर्वीप्रमाणे व्यापार होऊ शकत नाही असं सांगतात. ते अजूनही त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत का?, हे आम्हाला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे. जर ते ठाम असतील तर मोदीजी चीनबरोबर आधीप्रमाणेच व्यापार का करत आहेत?, मोदींवर असा कोणता दबाव आहे?,” असा प्रश्न पवन यांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर काँग्रेसने मोदींना चार प्रश्न विचारले आहेत. यापैकी पहिला प्रश्न भारत-चीन सीमेसंदर्भातील आहे. “एप्रिल २०२० मध्ये आपण ज्या ठिकाणी पाहारा देत होतो तिथेच आपण आता सैन्य तैनात केलं आहे का?,” असं काँग्रेसने विचारलं आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये, “पंतप्रधान १९ जून रोजी खोटं का बोलले?” असं काँग्रेसने सरकारला विचारलं आहे.

तिसऱ्या प्रश्नामध्ये, “तुम्ही (मोदीजी) चीनला सारखी सारखी क्लीन चिट का देत आहात?” असं विचारण्यात आलं आहे. तर शेवटच्या प्रश्नामध्ये काँग्रेसने, “चीनबरोबरची चर्चा यशस्वी होणार नाही असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. तर याचा अर्थ नक्की काय होतो?” असं विचारलं आहे.

अबक

काँग्रेसच्या मुख्य हॅण्डलबरोबरच वेगवेगळ्या राज्यांमधील प्रादेशिक व्हेरिफाइड अकाउंटवरुनही #BikGayiModiSarkar वापरुन ट्विट करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 5:12 pm

Web Title: congress asks modi government questions over india china issue with bik gayi modi sarkar hashtag scsg 91
Next Stories
1 “चीन स्थित बँकेकडून मोदी सरकारने मोठं कर्ज घेतलंय,” राहुल गांधींचा गंभीर आरोप
2 कांदा निर्यातबंदी उठवा, पियूष गोयल यांना पत्र लिहून फडणवीसांची मागणी
3 सुरेश रैनाच्या कुटुंबीयांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक
Just Now!
X